दगडू नी दुर्गी - दगडूचा खाडा
दगडू नी दुर्गी - दगडूचा खाडा "दगड्याsss ए दगड्या ..... " मालकाचा पारा आज चढलेला होता. घुश्यातच दगडूला हाका मारीत होते. "कुठे खपलास का काय रे माकडा ? " चिडून मोठ्याने मालक ओरडले व लगेच भानावर येऊन काकुळतीला येत म्हणाले " दगडू लवकर येरे बाबा".... टपरी साफसूफ करता करता पुन्हा चिडले. सारखे दगडूच्या धावा करत होते ... दगडूचा कुठे पत्ताच नव्हता. आवाजाकडे सावध कान नी चौकस नजरा ठेवून दुर्गी आपले रस्याकडेला सांडलेल्या साळीच्या गवताचा निवडून निवडून समाचार घेत होती.. एकीकडे टपरीवर नजर, दुसरीकडे दगडूच्या वाटेवर डोळे व तिसरे आपले खादीचे महत्कार्य अशी एकत्र कसरत जिकिरीची होती पण दुर्गीच ती जमवले तिने. "कुठे गेला असेल हा " मधूनच असा विचारही चमकून गेला.. पण "जाउ दे आपण सध्या 'ग्रास चर्वणम करिष्ये.. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा " असा पोटार्थी विचार करून ती चारा खाण्यात तल्लीन झाली.. हळूहळू टपरीवर लोक जमू लागले तशी मालकाची तारांबळ उडत होती. अचानक दगडू नाही म्हणताना त्याला गिऱ्हाईक सांभाळणे जड जात होते. "...