दगडू नी दुर्गी - दगडूचा खाडा
दगडू नी दुर्गी - दगडूचा खाडा
"दगड्याsss ए दगड्या ..... "
मालकाचा पारा आज चढलेला होता.
घुश्यातच दगडूला हाका मारीत होते.
"कुठे खपलास का काय रे माकडा ? " चिडून मोठ्याने मालक ओरडले व लगेच भानावर येऊन काकुळतीला येत म्हणाले
" दगडू लवकर येरे बाबा"....
टपरी साफसूफ करता करता पुन्हा चिडले.
सारखे दगडूच्या धावा करत होते ...
दगडूचा कुठे पत्ताच नव्हता.
आवाजाकडे सावध कान नी चौकस नजरा ठेवून दुर्गी आपले रस्याकडेला सांडलेल्या साळीच्या गवताचा निवडून निवडून समाचार घेत होती.. एकीकडे टपरीवर नजर, दुसरीकडे दगडूच्या वाटेवर डोळे व तिसरे आपले खादीचे महत्कार्य अशी एकत्र कसरत जिकिरीची होती पण दुर्गीच ती जमवले तिने.
"कुठे गेला असेल हा " मधूनच असा विचारही चमकून गेला.. पण "जाउ दे आपण सध्या 'ग्रास चर्वणम करिष्ये.. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा " असा पोटार्थी विचार करून ती चारा खाण्यात तल्लीन झाली..
हळूहळू टपरीवर लोक जमू लागले तशी मालकाची तारांबळ उडत होती. अचानक दगडू नाही म्हणताना त्याला गिऱ्हाईक सांभाळणे जड जात होते. "काय वो चायवाल्यानू दगडू दिसत नाही आज ? दोन भिश्किटा देशात काय चटकन, नी कटिंग पटकन . यशटी पकडूची आसा झटकन " मालवणी गुरवानी आडर दिली. त्याला उसंत काय ती नसते. पकडायची असते दुपारची यशटी नी येतो घोड्यावर तेही सकाळी सकाळी जीव घ्यायला . जरा काय तो धीर धरायचा नाही...
जाऊदे उगाच कटकट नको म्हणून मालकानी दोन बिस्किटे, कटिंग व पाणी टेबलवर पोचते केले..
"अरे वा मालक , वाटला नव्हता , तुम्ही यवढे ततपर असशालसे ...रवांदे .. चाय भिस्किटा आली.. आपला काम झाला. हिशोब लिवा डायरीत.."
"बोनी नायवो अजून ... असा करू नका " मालक किरकिर्या आवाजात आर्जवले.
"बरा बरा, हा चायचा रुपाया घेवा" दुष्काळी चेहेरा करत गुरव.
" जुन्या हिशोबाचं काय ? " मालक.
"आता पगार तर होंवदे.. नुसता जुना हिशोब, जुना हिशोब"
" या पगाराला नक्की करा , मला भारी पडते हो "
"हो हो नक्की " म्हणत गुरवानी गाशा गुंडाळला.
त्याच्या कडे उसना आव आणत मिश्किलपणे पाहत मालकानी अनवधानाने किटली उचलली ती हॅण्डल तुटलेली उकळत्या चहाची किटली होती मालकाचे हात पोळल्या शिवाय राहतील काय ??
"आ आआ आई गं sss" मालक रडकुंडीस आले
व भयंकर चिडून मोठ्याने "दगड्याssss ए दगड्याsss " अशी भयंकर आरोळी देत टपरी बाहेर आले हातात कालथा होता .... ती आरोळी ऐकून दुर्गी थरथरली ... कालथाधर मालकाची नजर तिच्या वर पडताच दुर्गी वाट फुटेल तशी सैरा वैरा पळत सुटली..... ....
लेखन:अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा