रामले आक्का

 रामले आक्का


       घेरी येऊन पडेल अशा भरदुपारच्या उन्हात 

पाssटयाsssला  टाsssकी लावा  बायेssssss

आवाज घुमला की ओसरीवर ,पडवीत  वामकुक्षी घेत पडलेले बापे ताडकन उठून शिव्या हासडत. नी आपल्या दारातून हुसकून घालवायच्या नादात तिच्या वर रेकत "ए चले नीsssघ इथून, ती तिथेच ढिम्म. "कळत नाय का भवाने ? जर्रा पडू देत नाय. जा पुढे चालती हो" 

      हिरव्यागार नऊवारीची गोलसाडी नेसलेली.  निऱ्यांचा भलामोट्ठा वरवंट्यासारखे केळे ओटीपोटाशी गच्च बांधलेले.  डोक्यावरून अंगभर पदर घेतलेली. उघड्या बाह्यावाली काळी कुळकुळीत रामले आक्का वडारिन तशी काय साधी वाटली की काय ? ती ढालगज बाई  साध्या गावकरी बाप्याला ऐकते काय? 

दुप्पट मोठ्याने पाssटयाsssला  टाsssकी लावा  बायेssssss आरोळी ठोकत दारा समोर ठाणच मांडलं तिनं. पण एक वावगा शब्द पुरूष मडळीला बोलली नाही. कांबळं पांघरून गावात घुसलेल्या भिलांच्या टोळीने उंदिरघुशिंचा माग काढत एखाद्या पडक्या घराच्या बाहेऱून दिसणाऱ्या बिळात गवताची गंजी पेटवावी.  धूर करावा. नी  आजूबाजूच्या बिळातून पटापट उंदिरघुशी बाहेर पडाव्यात तसेच काहीसे घराघरातून रामलेआक्काच्या आरोळीने बायका बाहेर पडल्या ... 


   मागोमाग पाटीलवाड्याचा गडी दामू , पाटलीण बाईचा पाटा वरवंटा रामले आक्काच्या समोर अलगद खाली ठेवून खालमुंडी चालता झाला. मिनिट भरात जमलेल्या बायकांनी दामूला आपापल्या पाटा वरवंट्याचा मक्ता देण्यात कसूर केली नाही. सहा सात जोड जमा झाले.  पाटलाच्या ऐसपैस ओसरीवरच सगळा बाजार भरला होताना .. एवढ्यात रामले आक्काची मुलगी आणी सून दोघी तिथपर्यंत येऊन पोहोचल्याही. एकापेक्षा एक नाकी डोळी वरचढ ? रूप तर रूप पण रंगही एकदम ! कलर गया तो पैसा वापिस. बघुन दचकायला नाय झालं शपथ. दोघींपेक्षा रामले आक्का शंभरपट बरी. पण दोघी खूप आज्ञाधारक !  रामल्याक्का ची नजर त्यांच्यावर पडताच त्यांना काय ते समजले त्यांनी एक एक करून आपल्या कामाचा ताबा घेतला. आपली हत्यारं काढून जरा चालवून पाहिली. "दादा शेट बालटीत बरून पानी देवा की " दामूला त्यांनी विनंती केली व बादलीत पाणी मागवले . जीभेची कडक असली तरी मायाळू होती रामल्याक्का. तिला पाहून अजिबात परकं वाटायचं नाही. उगीच नाही बायका तिच्या भोवती रुंजी घालायच्या. 

    "बरं झालं आक्का तू आलीस बाई..  माझा पाटा बेक्कार झालाय गं, काहीच नीट वाटता येत नाही"  

पाटलाच्या सूनेनं आपलं दु:ख मांडताच चेव चढलेली वडारीन म्हणते कशी

 "मंग  दिवाळीला आलतो तेव्हाच बोललो तुला टाके लावून घे बाई , मी परत लवकर येत नाही. तर काय बोललीच तू" 

नाक उडवत तिची चेष्टा करत तिच्यासारखं बोलायचा मजेशीर प्रयत्न करत "बई बई नको गं आक्का, माझा नवऱ्यानं मला मिस्कर का फिस्कर आनूनं दिल्लंय.. मला आता पाटा वरवंटा लागत नाही एवढा.. हूं" 

"आली मोट्टी शेटानीन... मंग आत्ताच का गं माजी आटवन आली माय तुला ?"  

सुनबाई काय बोलणार?  आख्या घराचं नाक वडारनीनं पाटलाच्याच दारात अवचित कापलं होतं. 

दारातला बाप्या एव्हाना शेताची वाट धरून चालता झाला होता. 

उजवीकडची शेजूळ शेजारीण म्हणाली

 "अगं म्हातारे !  तुला नाही माहित...." 

तिला अर्धवट तोडत चवताळल्यासारखी नाटकी आवाजात

    " म्हातारी कोनाला बोलली ग शेजूळने ? आ sss ? 

तुला खाद्यांवर घेऊन पळतो बग आत्ता पाच कोस...आं sss उठू का ? 

" नको गं नको खरंच माझ्या पाठीची चमक कालंच निघालीय. तुझा काय भरवसा ?  काखोटीला मारून पण पळशील बाई" 

एकच हशा पिकला सर्वजणी भयंकर हसत होत्या.  तर शेजारीच  बसलेल्या वडारनीच्या लेक-सून दोघी ठार बहिरटल्यासारख्या, चेहेऱ्यावर एकही रेष उमटू न देता कामात गर्क होत्या. हसता हसता त्यांना पाहणाऱ्या बायका चपापून गप होत. दोघीजणी मात्र आपल्या हत्यारांना धार, टोक काढण्यात आपल्या गुंग.  

रामल्याक्का "अगं माज्या हातचं टाकं सा मैनं करकरीत ऱ्हातं गं , तुला नाय कळायचं गं ! तू शेरवाली ना ,  मिस्कर वाली .. हूँ (नाक मुरडत ) 

इतक्या पुन्हा शेजूळ बाईनी कंबर कसली "अगं तुला माहीत आहे का ?  आमच्या गावात विजेचा प्रॉब्लेम आहे ना .. कधी येते कधी जाते नेम नाही. मग काय ? झाला मिक्सर खराब , नी  शॉक सुद्धा  लागतो त्याला भयंकर.  नीट करायला ही खर्च फार होतो म्हणे " एवढं ऐकायची खोटी पुन्हा तिला मध्येच तोडत.   " का? .. झाला का मिस्कर खराब..?? होन्नारच ना ...  येकयेक नाटकं बाई तुमची .. दगडच घालतो मी तुमच्या मिस्करवर .. आमच्या गरीबाच्या पोटावर पाय देता काय ? अगं पाच रूपेला जोडी करतो परवडलं तर सांगा नाय तर जाऊ दे बाई मला, पेंकर पाड्यात लई काम हाय मरूसतोर" 

"असं कसं ? दिवाळीत चार रुपे दिलेले ना ?"  मोऱ्याच्या  बायकोने अलगद चाचपलं .. वाचला रुपाया तर पहा. 

"हो गं हो ! रडून रडून चार दिले.  नंतर पाच घे म्हनलेली ना तूच मोरने ?  ये ना म्होरं" रुपाया वाचवण्याच्या नादात कचाट्यात सापडलेली मोरे बाई गोरीमोरी होऊन शरणागत झाली. 


       पाटलीण काहीच बोलेनासी झालेली पाहून रामल्याक्काने बाजू सावरायचा प्रयत्न केला. " जाऊद्या गं आठाणे कमी द्या . आता बोला " . सर्वांचे चेहेरे खुलले.  आता शेजारच्या गावातल्या चहाडीचुगल्यांना ऊत येणार हे पाहून कोण आनंद सगळ्याजणींच्या चेहेऱ्यावर काय सांगावे. 

   

    सौदा जमला नी वार्ता सुरू झाल्या.. 

इकडच्या तिकडच्या गप्पा टाके मारता मारता चालू ..

मध्येच ..."काय भाकर तुकडा असल तर दे माय....  एक लोटा पाणी बी दे ... नसंल भाकर तर थापून घाल गं मैतरने....  माज्या साटी कर गं माय  यवडं   ...खातो हितच बसून कांदा मिरची हाय माझ्या जोळ..." तिच्याकडून मिळालेल्या  बातम्या ऐकून मिनिटामिनिटाला सगळ्याजणींच्या चेहेऱ्यावर अनंत भाव येऊन गेले.. सगळ्यांना तृप्तीची ढेकर आली .. 

तिघिंनी काम उरकताच सर्व पाटा वरवंट्यांना नमस्कार केला. 

काम झालं.

 नी सूचना घुमली.. तो हक्क तिलाच .. 

रामल्याक्का पाटलीणिला म्हणाली 

"पैला लक्षुमिला हळद कुक्कु वाहून  मुटबर तांदुल पीस बाई ...आनी चांगला धूवून आंगुळ घाल ......मस्त पाटा हाय तुझा, असा दगड आत्ता मिळत नाही ..."

खरं खोटं देव जाणे पाटलिणीची मान ताठ झाली होती . तिच्या घरून गरम गरम भाकऱ्यांच्या चळती बाहेर आल्या .

एकेक भाकरी खायला नी एकेक प्रवासाला तिघिंनी घेतल्या व उरलेल्या ठेवून दिल्या. 

भाकरी खाल्ली हात धुतले नी पुन्हा आवाज घुमला.. 

"दक्षना आना गं .... "

तशा सर्वांनी पसाभर तांदूळ नी साढेचाररुपये प्रत्येकी मजूरी दिली. "देव तुमचं भलं करो गं" असा तोंडभर आशिर्वाद देत तिघी पुढच्या वाटेला लागल्या. 

इतका वेळ दबा धरून बसलेली मोकाट पोरांची गँग त्यांच्या मागे लागली. तिघिंच्या मोकळ्या पाठीचे रहस्य काही त्यांना कळत नव्हते. नी उगाच बिनकामाचं त्यांच्यामागे वेशीपर्यंत निघाले .या फिदीफिदी गँगची खोड मोडावी म्हणून रामल्याक्काने खालीवाकून एक खडा उचलला नी त्यांच्या दिशेने भिरकावला व ओरडली " जा रे पोरांनो रानात वाग सुटलाय...  व्हा मागं .... "  दचकुन पोरंही मागं फिरली पण  एका सुरात आरोळी देत गावात शिरली पाssटयाsssला  टाsssकी लावा  बायेssssss मागे हशा पिकलेला हलके हलके ऐकू येत होता.  फिदीफिदी गँगला दोनतीन दिवस ही आरोळी आता  सहज पुरणार होती.....                  ....©*अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी