नशिबाला धोंडा
नशिबाला धोंडा
तिने त्याला भुलून वरले
त्याने तिला भुलवून वरले
तिच्या समोर लीला दाखवी
तिच्या मनात भरून राही ||
बघता बघता दिस सरू लागले
तिला काही बोचू लागले
तो अगतिक जणू बापुडा
तोलतो आहे संसारगाडा ||
तिला बोलावे वाटे दुखले खुपले
केविलवाणा चेहेरा त्याचा
शब्द तिचे तिच्या उरी
घुसमटले ||
आणखी दिवस
सरता सरता
खपली धरता धरता
जखमा वाढत गेल्या ||
स्फोट तिच्या भावनांचा
होणे स्वाभाविक झाले
दोन जिवांचे ठीक होते
तिसऱ्या वरही प्रसंग बेतले ||
आता उपाय पुन्हा सोयीचे
करावे त्यांचे भासेलसे
घरकुलाचा पिंजरा केला
खेळात रमली माय पिले ||
पुन्हा होते उजवे डावे
मन मारून जगावे
लेकरांची ती आबाळ
देखवेना ||
आता मनाचे करावे
घरकुल सावरावे पिले हसवावी
पाचवीस पुजिली
दीनता ज्यांच्या ||
देखावा हसरा निर्माण झाला
पिले सुखावली
कुंकू चमकू लागले
गोतावळा तसा होताच थोर ||
त्याला गणगोत फार
त्याचे करीत जबर
पुन्हा लेकरांची झाली
हेळसांड ||
आले आजाराचे फॅड
कितिकदा ते तयाला
त्यांचे करावया कोण
कुत्रं फिरकेना ||
तिच्या घरची राबली, कष्टली
ना दावता रुबाब
आल्यागेल्यांचे ही केले
किमत त्याची कोण करी ||
येती सर्व त्याचे लोक
सुरु हास्याचे फवारे
टोमण्याच्या बरसाती
खानदानी ||
आजाऱ्याचे सर्व खर्च
बाई निभवी स्वताच
तिच्या कुटुंबाची साथ
सोबतीला ||
कोणी पै ही दिली नाही
खर्च मोठमोठे झाले
पुरे पडावे कसले
तुटपुंज्याचे ||
मुले शिक्षण करिती
जुने फाटके नेसती
राव चमकता ठेवला
येथे चुकली ती ||
परमात्मा देई गुणी
लेकरे ही का अशास
नाव ठेवितो सर्रास
उठता बसता ||
एक बोल नाही त्याचा
काही कवडी मोलाचा
कुत्रं विचारीना ज्याला
अशाची पालना
सार्थ करी ||
मुले बेवारशी केली
केली हिडीसफिडीस
आज तीच येती कामी
गुणाची ती ||
उगा व्यर्थ केला जीव
नालायका पाठी सारा
त्याला तिची ना कणव
बिन कण्याचा ||
स्वार्थासाठी त्या धरीती
लोक फुका हिंडविती
लष्कराच्या मारी थापा
मोठमोठ्या ||
घरी नाही दाणापाणी
काय करील दिवाणी
आयुष्याची केली माती
याच्या साठी ||
मग बाई खेळे डाव
जमविली तिने माया
तिची माया उधळून
पुन्हा तिला ठेवी नाव ||
त्याचा डाव ओळखाया
तिला जमलेच नाही
नवनवं मार्गाने
तिचे शोषण तो करी ||
जेव्हा वेळ येता घाली
शेपूट घाबरट
वर आव आणि मोठा
त्या गावचेच नाही ||
वाल्या कोळ्याने पोसला
जीव कुटुंबाचा तरी
त्याच्या कर्मात सहभागी
कोणी नाही ||
तिने समजून घ्यावे
उभे ताठ राहावे
आपले आरोग्य जपावे
कर्म नेटाने करावे ||
व्हावे तिनेही विचारी
हसू माळावे अंतरी
कटी बांधावी करोनी
मन घट्ट ||
द्यावी जिवास उभारी
ठाम करावी लेकरे
लेच्यापेच्या साठी खेळ
हारू नये ||
नाही अशक्य काहीच
धरलीस तू उभारी
साथ तुझी द्यावयाला
तुझे सर्व ||
काल आले नाही कोणी
आज येणार न कोणी
केली संसारकहाणी
तुझी तूच ||
तुझ्या सोबतिला आले
राख मनी त्यांचा मान
कष्ट करावया तुला
व्हावे लागेल तत्पर ||
आज कुणाची ही नाही
साथ वाटे तुला खंत
काल ज्याची होती साथ
जाण नसेल निवांत
तुझी चुक तूच जाण
कोणी केला स्वार्थ त्याग
कोणी ऐनवेळी केला
तुझ्या सुखाचा तो अंत
नको विसंबू पुन्हा तू
नको पुसावया दवडू
वेळ तुज कमी आहे
तू चालावे अविरत ||
तुला थांबायचे नाही
तुला रडायचे नाही
पेरायाचे तुला फक्त
नाही खुडायाचे आता ||
कष्ट करीत हसत
राख जीवनाचे सूत्र
तुझ्या लेकरांच्या ठायी
आता पाहावे सन्मित्र ||
खूप सोसले ग त्यांनी
तुझ्या वेडापायी सारे
तुझ्या प्रेमाचे अपूरे
त्यांच्या वाट्याचे फवारे ||
आता उठ हो तू नवी
त्यांना देई सर्व त्यांचे
तेच फेडतील पांग
तुझ्या उभ्या ग जन्माचे ||
होई उदाहरण
सोडी स्वार्थी अभिमान
मुंगी होऊन साखर
खाई आता ||
भोग चुकला कुणाला
राजा राणी दानी शूर
येता प्रसंग पालटे
होई कफल्लक नूर ||
बायकांच्या नशिबाला
जगी बांधलाहे धोंडा
राहू नये विसंबून
तरी पारखून घ्यावा ||
जास्त अपेक्षा नसावी
कोळसाच घ्यावा मनी
पाहा घासूनी पडताळा
हिरा उजळेल खरा ||
असे घासणे जमले
ज्या ज्या माऊलीला जगी
तीच संसार संगरी
जेती होईल ती खरी ||
नको दिखावा घरास
नाही मोठा बडेजाव
असे घर ते सुखास
पात्र होते ||
छानछोकी केली खूप
खूप जमवले मित्र
वेळ येता शेणगोळा
हिणवतं साधं कुत्रं ||
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा