तो आलाय

#BharatJodoYatra 


#नफरतछोडोसंविधानबचाओ 


तो आलाय


तो आलाय

तुझ्या दारात 

तुझ्या गावात 

पंचक्रोशीत दुमदुमतंय

नी तो, पुकारतोय तुला 

ठोठावतोय तुझ्या मनाची कवाडं  

जागं करतोय तुला

नी तू झोपलायस् झापड घेऊन

ऐकतोयस् सावधपणे

तुझ्या मनात भरलीयेत किल्मिशं

दाटलीयेत जळमटं 

कित्येक दशके ऐकून ऐकून 

विषाक्त झालेत तुझे कान. 

तुझ्या मनात फुलतोय अंगार,

तुझ्या जिभेवर काटे फुलतायत त्याच्यासाठी

आणि तो निशस्त्र होऊन आलाय.

त्याच्याकडे आहे शस्त्र प्रेमाचं, करुणेचं, नी अदबीचं. 

तो तुझी वाट पाहतोय, त्याच्या नजरा शोधतायत तुला.

तो बघतो मान उंचावून, असशील तू समोर म्हणून 

तो वळून बघतोय डावीकडे, नी उजवीकडेही..

वाहत्या दुतर्फा भावनांच्या कल्लोळाकडे 

पाहतोय तो समाधानाने आणि कृतज्ञतेने ही. 

तो कवेत घेत चाललाय, दोन्ही हात उंचावून उघडून 

सर्वाना हक्काचा खांदा देत, 

सर्वांना हक्काची छाती देत. 

कोणी डोके ठेवतेय त्याच्या छातीवर, दंडावर, बाहूवर

कोणी हात धरतेय त्याचे, 

कोणी त्याला पोटाशी धरते आहे. 

तो पुसतो आहे त्यांचे क्षेम कुशल.

कोणी मायेने त्यालाच गोंजारते आहे, 

कोणी गालगुच्चे घेतात त्याचे. 

आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना हेलावून टाकत, 

मोहून टाकणारा, तेजस्वी स्मिताने भूरळ घालणारा गोकुळीचा कान्हाच जणू .

पायपीट करत आलाय तो तुझ्या गावात, कुठायस तू ?

तुला शोधतोय तो, आतुरतेने, मायेने ओसंडून जाणाऱ्या 

प्रेमळ चेहेऱ्याने, शोधतोय तो तुला. 

तुझ्या हाकेची वाट पाहतोय रे तो, 

नको होऊस निष्ठूर तू असा !

जा, भेट घे, आलिंगन दे, प्रेम वाहूदे,

गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, क्षिप्रा एक होऊदे.

सारे सारे निर्मळ होऊन जाईल.

सारे सारे आल्हाददायी होऊन जाईल.

उतरेल मणामणाचे ओझे या छातीवरून, 

नी त्याच्यावर केलेल्या अन्यायाचे होईल परिमार्जन. 

त्याचेच सर्वस्व हिरावून घेऊन, त्याच्यावरच रुसून बसलायस का ?

अरे करंट्या, दुष्टा जरा तरी बाळगावी, 

जनाची वा मनाची तरी.

दारी आलेल्याची पायवाट सोपी तरी करावी, नाही का ? 

की तुझ्यावर तसले संस्कारच व्हायचे राहून गेलेत ? 

पण !  तो बघ किती संस्कारी.  

सर्वस्व हरपले तरी चेहेऱ्यावर किंतू नाही. 

फक्त देणेच शिकला जो त्याला काय उणे ? 

त्याच्या साठी माझे तुझ्याकडे इतुके मागणे.

ऊठ, जा, भेट घे निदान प्रयत्न तरी कर 

कळेल त्याला , पोचेल त्याला,  

तुझे नुसते हात उंचावून, हालवून 

त्याला साथ देणेच देईल बळ पुन्हा हजार हत्तीचे 

नी तो तुझ्या सद्भावना घेऊन, 

पुढच्या मित्राला हाक देत, 

तुझे कौतुक सांगत, सलग जात राहील पुढे 

त्याच्या दारात 

त्याच्या गावात 

पंचक्रोशीत दुमदुमत 

पुकारत त्याचे नाव

नी ठोठावत त्याच्या मनाची कवाडं

जागं करत त्यालाही ......

   ©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी