दृष्टांत

दृष्टांत


हे राम ! 

शब्द पाहिले की 

नकळत पाय थबकतात 

आमच्या साठी तो आपला 

प्राण देवून गेला 

किंचितही हळहळ नाही....

वसा हाती घेवून तो 

पूर्णत्वास नेण्याचा चंग होता त्याचा

तो पूर्ण झालाही असता ..

जनता गाफील राहिली नसती तर...

अनेक प्रश्न मनात उमटत होते 

आज त्याच्या स्मृतींशी संवाद साधताना 

विचारू या मिषाने मनाचा हिय्या करून 

हार फुल घेवून पहाटेच आलो होतो...

नी त्यांचे दर्शन भान हरपून घेत राहिलो 

स्तब्ध झालो.... एकटक फक्त पाहत राहिलो..


हे राम म्हणत , 

होय होय मीच 

तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देईन... या ..

फक्त मीच देऊ शकतो 

अशी काहीशी आमंत्रण युक्त वाणी 

तिकडून उमटते नी सर्व 

हलके हलके होऊन जाते


मग ? मला तुमचे प्रश्न रोज रोज 

येऊन भंडावून सोडतात तर...

मी क्षणभर पाठमोरा होऊन 

विचार करतो नी 

माझ्या लक्षात येते की 

या प्रश्नाचे तर आपण 

केव्हाच उत्तर दिले आहे 

तसे संदर्भासहित मी सांगुन टाकतो ...


मग मी वळून पाहतो तो 

हे राम! 

पुन्हा एक नवीन चेहेरा, पुन्हा एक 

जुनाच प्रश्न घेऊन हजर झालेला

मग मी पुन्हा त्यालाही 

संदर्भ सांगतो पुस्तक नी पानही  सांगतो


आणि त्याही मागचा प्रश्न घेतो 

उत्तरादाखल बोलायला 

तोंड उघडायला नी 

त्याच्याही उत्तराचा संदर्भ 

शब्दनशब्द रांगेत 

घश्यातून पोटात 

सुरळी होऊन तयार 

हे राम! 

पुन्हा मी चकित होतो .. अरे?


ह्याचेही उत्तर पुस्तक नी पान ? हम्म..

एक शब्द जुळवायचे 

श्रम मला घेऊ देत नाही 

हे राम! 

माझ्या शरीरात हे कसले यंत्र बसवले आहे 

जे सर्वांगातून असे बोलत सुटते

माझे बोट, माझे डोळे, माझा चेहेरा 

सर्वांग, सर्वांग, सर्वांग असे कसे बोलते? 

थक्क करणारा थरार निव्वळ ...


हे राम! 

परकाया प्रवेश की काय 

कोण आहे हे , जे मला असे पिडते आहे 

काहीच कसे बोलू देत नाही ? 

सर्वच काही ग्रंथबद्ध करून 

संथा घेऊन पुरश्चरण पारायणे केल्यागत 

सूत्रबद्ध उमटत जाते विनासायास ? 

कमालच आहे नाही ?........

एक दीर्घ स्त ब्ध ता .....


आज त्यांच्या स्मृतींशी मनोमन बोलताना 

जणू तेच माझ्याशी बोलत होते 

मी थरथरत ऐकत घामाघूम होऊन 

त्यांच्या पायाशी उभा 

त्यांच्याचसाठी आणलेला 

हातातला हार केंव्हाच पाकळ्या होऊन 

त्यांच्या पायाशी लोटांगण घेत होता

हे राम ! हे राम ! चा अखंड गजर 

मंद मंद उमटत होता 


अनेकांचे अनेक प्रश्न रुंजी घालत 

मनात घोळत होते दिवस भर 

ते त्यांनाच विचारावे असे मनात घेऊन 

दर्शनाला गेलो होतो 

तर मला साक्षात दर्शनच देवून 

गप्पा मारल्यासारखे दृष्टांत देवून गेले.

हे राम ! चा अखंड गजर मनातून  नी

उमटलेला काटा अंगावरून जाता जाईना 

कितीतरी वेळ मी त्या विचित्र अनुभवातून 

बाहेर पडू शकलो नव्हतो...

हे राम ! 


जगात सर्वाधिक वाचला जाणारा 

सर्वाधिक ज्यावर लेखन झाले 

सर्वाधिक लोक ज्याच्याकडून 

आजही शिकत आहेत अशा..


अशा विद्यापीठाकडे प्रश्न घेऊन गेलो तर 

असे होणे किमान अपेक्षितच नाही का ? 

चला, या अखंड चलचित्रपटा सारख्या 

महाकाव्यासमोर आपले प्रश्न ते 

किती टिकाव धरणार ? 

त्याची उत्तरे केंव्हाच त्यांनी कालमुद्रित 

करून ठेवली असणार ना ! 

किती किती पुढचे पाहिले असेल त्याने 

किती तीक्ष्ण तीव्र भेदक शोधक प्रकाशित दृष्टी ती

त्याच्यासमोर फक्त नी फक्त नतमस्तक व्हावे 

यापलिकडे कसलाच उपाय राहात नाही ...

©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी