काव्य नमन
(काव्य संग्रह - मोतियाची फुले)
काव्य नमन
एखादे अक्षर,
एखादा शब्द
एखादे कडवे,
नी एखादी ओळ
काही कडवी,
काही ओळी
कधी गीत,
नी कधी भूपाळी
कधी काटा,
कधी वाटा,
कधी आकाशी,
नी कधी पायदळी
कधी एकांत,
कधी बोभाटा,
कधी कशातून,
कधी कुठून
नी केव्हा,
ती उमलेल,
अवचित फुलेल,
तिचा नेम नाही .
काय बोलेल,
नी काय सांगेल,
नेम नाही,
आवडेल ,
नावडेल,
क्षेम असेल,
की खबर असेल,
सांगता येत नाही .
ती कविता आहे,
ती निर्बंध आहे,
ती कशीही वाहील,
तिला कोण अडवणार ?
तिला कोण रोखणार ?
तिला कोण प्रश्न विचारणार ?
ती विचारणार
नी उत्तर द्यावे लागणार ,
तुला मला नी सर्वांना
तिच्या शक्तीची
कल्पनाही करू शकेल
असे कोणी सामर्थ्य
अजून जन्मायचे आहे,
रुजायचे आहे
अजून या भूतलावर.
झाले मोठे,
होतील मोठे,
नावाजतील
एकमेकांना
खोटे खोटे,
कुणाच्या गुणाला
नसेल अंतपार
कुणी जाईल
काव्याच्याही आरपार
कुणी रचतील
देशभक्तिपर काही
कुणी रचेल
पद्य-पाठ-गीत-सोरठे.
तर कुणी पेरतील
उलट विषच प्रवाही
मनाचा घेऊन
ठाव कुणी
हृदयाचा करतील
सौदा क्षणी
शुद्धीत येण्या अगोदर पसार
होतील त्यांच्या
मोहक काव्य रागिणी.
काव्याला हाताशी
धरून काही
वळवितात विचारांचे
प्रवाह दाही
नेतात गाडून टाकण्या,
सिंधू तळाशी
उत्तमोत्तम वाहुनी
विचारधनांसी
अश्या क्रूर नराधमांची
ओळख कवितेला
इतिहासात अजरामर
करून ठेवी तयाला
भुलता कुणी गोड
शब्दांस त्यांच्या
करते सावध क्षणी
कविता तयाला
तरीही बळींची
संख्या अजब ही
किंकर्तव्यविमूढ
करिते मनाला....
अश्या अगम्य
चक्रव्युहाचे भेदना
कविता आणी हेरून
विशेष गुणिजना
चंदनी मंजुषेत
विशेष जखडून
मातृमुखाने गात
विचारधन पाळणा
सवोत्कर्षाचा विचार घेऊन
अभ्युत्थानासी
सिद्ध होतो वीर रमणा
मनमंथनाचे
तप घोर वाही
उसंत न घेता
कार्यात राही
अश्या उच्च
नरपुंगवाची समर्थ
कविताकृते धन्य
गाथाहो सार्थ
अशी सुप्तबीजी
कविता हो प्राप्त
जरी गम्य गुप्त
न होता ती लुप्त
कार्यास तत्पर ती
सदा सारतप्त
भूतांसी व्यापून
जणु सिंधुसप्त
नमोनी मनसा
तुज प्रार्थितो माते
कृपा करी
काव्यराणीव ज्येष्ठे
यदा गम्य तुझिया
मी पामर शब्दयोजनी
दे किंचित रजकणसम
स्थल मज तवचरणी
***
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा