पहा बरे संदर्भ लागतो आहे का ....
सर्वगुणसंपन्न अशा भूमीबद्दल
ते ऐकून होते
कैक पिढ्या ते मार्ग शोधीत होते
कित्येक पिढ्या ते घालून खर्ची
जुळवून सोयरिक संपादून मर्जी
मिळविले खजीन्याचे मार्ग योजना सूत्रे
टिपून ठेवताना न कधी थकली ती गात्रे
येऊन ठेपेस्तोवर जाणून गुपिते
अनंत अखंड ज्ञानास भाळून कुपात्रे
मुठीत करावी सर्व हेच त्यांचे कुभांड
भूमीत पाय रोविती ते घट्ट
आगंतुकांस कुतुहले पाहण्यात यजमान मग्न
मोहोनी जनतेस येथील मनोरंजनाने
वा अर्पूनी साहित्य साधने मुक्तहस्ते
दातृत्वाचा पिटोनी घोर डंका
खाली पहावयास लावून यजमानास
इप्सित दुष्ट साध्य करण्यात थोर सिद्ध
ज्ञानास काबीज करण्याचे क्षुद्र सामर्थ्य
या डावपेचास तयार नसलेले यजमान
सांगोनि कौशल्य खुले मुग्ध हास्य
सभोवतीचे सुंदर गगन विशाल
धरित्री रमणीय त्या तसेच सर्व लाल
अशा भावनेने सढळ हस्ते दाता हो गोपाल..
सर्वकाही जाणोनि सूत्रबद्ध केले
खाली तयानी स्वयेचि हस्ताक्षर ते केले
ज्ञानी गुणिजन दाते ते ऋषिनामे ओळखिले..
तीच चूक तयांची हे ज्ञात असू द्यावे
ते ऋषिजन चमत्कृती सिद्ध योगी
वा क्रूर क्रुद्ध गणले आणिक सारा रोष तेथ वळविले
किती ते दूरदृष्टा आगंतुक अभिजन वा
आश्रित म्हणोनि आले नी भूपालचि मग झाले..
आम्हास तयांच्या पिढ्यांनी कित्येक
हिणवोनी हैराण केले तदनंतरीही..
इतिहास भूमिचा कल्पोनी पाहता
किती सरल सुगम सभ्य सार्थ भासताहे
दातृत्व विशाल लेवोनी भूवरी
भरतखंड जंबूद्वीप हिमाद्रीची जननी
पुरुषार्थ अनंत सिद्ध करित दिगंतरी
जन्मास येताच कार्यास सिद्ध
नवनवीन प्रात्यक्षिकास त्वरित सज्ज
कैक शोध लावोनी फुलवोनी जीवने
अमर्याद निर्बाध प्रकृतीची साधने
समुद्र आकाश भूमीशी सख्य
नाही काही अंत नी कोणतीही बाधा
बंदिस्त दिसले ना जीवनाचे मार्ग
चहुकडे उधळले खूर पाउलाशी गात
पाण्याचि भीती ना अंबराची धास्ती
कोठेही दिसली ना क्षणैक विश्रांती
आवडीचे शोध नी कौशल्य प्राप्ती
कोठे गर्व ना कसलाच माज
येईल त्यास हात अभिवादनाचा
मुखी घास तृप्ती नी संवेदनांचा
दुज्यास लाभावे हे सूख सारे
संकोच कधी ना कुठे दृश्य झाला..
याचेच मोजोनि नफ्याचे गणीत
कुटिल कारस्थानाचे घोर आले पीक..
जे जे म्हणोनी आहे येथले रे
ते ते तयांनी लाटलेत सारे
नामावरी मग करोनी तयांच्या
मुळावरी एकेक घातलाहे घाव..
कैक हजारो वर्षांचे ज्ञान
जपोनी प्राणिमात्र जगती जगतात
मानवास ज्ञानाची विशेष लागण
करी तो लिखाण जो जो सूज्ञ झाला
या लिखाणास सार्थकी लावण्या
त्याने शिकविणे आरंभिले मग
तशी मूर्त भाषा जगी होत गेली
तसे आपुलेच होते ते जग
लिपि आपुली ती बोली आपुलीच
अगम्य आगंतुका न कळेच विषय
भावना समजल्या त्या सुगम रम्य काही
मग सामाईक बोलीची निर्मितीही होई
त्या बोलीचा पुरेपूर करोनी वापर
आगंतुके आक्रमिले ज्ञानाचे आगर
ज्ञान सागराची केली घोर चेष्टा
कळोनी आले ना कोणास काही.
गुणग्राहकतेचा मान राखे यजमान
प्रेमे जपोनि सहिष्णुता सहजीवन
सौजन्य राखोनी स्वागतास सज्ज
भूमिपुत्रे सदैव राखला सौहार्द्र
सर्वज्ञान बहुतेक होता निबद्ध
कार्यास विराम देतो आगंतुक
बहुकाळ व्यापी हे कार्य मुख्यत्वे
एकजीव भासे हा समाज परत्वे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा