*डॉक्टर दाभोलकर स्मृतीदिनानिमित्त ठाण्यात विवेकी जागर फेरी*
ठाणे ,दिनांक 20 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, ठाणे शहर आयोजित,
समाजाला विज्ञान, निर्भयता, निती या त्रिसूत्रीचा संदेश देणाऱ्या, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेस दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी १० वर्षे पूर्ण झाली. परंतू डॉक्टरांच्या मारेकऱ्यांना, सूत्रधारांना पकडण्यात पोलीस वा सरकारी यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. ह्या बाबतीतला जनतेचा रोष आणि आक्रोश संवैधानिक मार्गाने, सूज्ञ, विवेकी निदर्शनातून सरकारला आपले निवेदन व्यक्त करण्याच्या नेहमीच अवलंबिलेल्या मार्गाने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे नगर परिसरात विवेकी जागर फेरी काढली.
या जागर फेरीत शासनाने मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडावे असे आवाहन कार्यक्रत्यांनी केले. दाभोलकरांचे वैज्ञानिक दृष्टिकोनवादी विचार रुजवणाऱ्या घोषणा *जागर फेरी* मध्ये दिल्या गेल्या.
अमर रहे, अमर रहे | डॉ दाभोलकर अमर रहे |
फुले, शाहू, आंबेडकर | आम्ही सारे दाभोलकर |
माणूस मारता येतो | विचार मारता येत नाहीत |
लडेंगे | जीतेंगे |
उठ माणसा जागा हो | विवेकाचा धागा हो |
जागर फेरी कोर्ट नाका ठाणे येथील डॉ आंबेडकर प्रतीमेपासून सुरू झाली आणि ठाणे मंडई मार्गे ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम येथील आंबेडकर प्रतिमा येथे सरकारकडे रोष आणि आक्रोश व्यक्त करून डॉ दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्याचे आवाहन केले.
अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदेंसोबत विविध समविचारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ कामगार नेते जगदीशभाई खैरालिया, पर्यावरणवादी Eco friendly movement चे डॉक्टर अशोक, धनाजी सुरोसे, सिद्धांत चासकर, कार्यकर्ते शुभदा चव्हाण, राजेंद्र चव्हाण, हेमा रामचंद्रन, पुष्पाताई तापोळे , अथर्व लिपारे, अजित डफळे, अशोक चव्हाण, कल्पना चेट्टियार, अँब्रोस चेट्टियार, अनिल शाळिग्राम , म्यूज फाउंडेशनचे निशांत बंगेरा तसेच शिक्षकवर्गातून प्रतिनिधी ज्योती कांबळी, सहकार्य अजय भोसले, विशेष सहकार्य समीर शिंदे, संजय महाजन अंनिस अध्यक्ष, ठाणे शहर, असे सुमारे 40 समविचारी कार्यकर्ते *विवेकी जागर फेरीस* उपस्थित होते
या सोबतच डॉक्टरांच्या 10 लघू पुस्तिका रुपात आलेल्या आवृत्तिचे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात जनतेच्या उपस्थितीत प्रकाशन माई वंदना शिंदे आणि मान्यवर सदस्यांच्या हस्ते केले गेले. काही पुस्तके प्रवाशांनी तिथेच विकत घेतली.या वेळी कार्यक्रत्यांनी जनतेला आवाहन करत आपले विचार मांडले. ठाणे नगर पोलिस अधिकारी यांचे उत्तम सहकार्याने जागर फेरी सुरळीत झाली. ठाणे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमे जवळ यशस्वी *विवेकी जागर फेरीचा* समारोप झाला.
वृत्तांकन : अँब्रोस चेट्टियार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ठाणे शहर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा