सय
सय
आली आली गं सय
आली आली गं सई
मन बालपणी जाई
तुरू तुरू खारूताई |
सारे खेळ सवंगडी
घरादारात जमूनी
माजे दांडगट दंगा
शमे फटके खाऊनी |
गोड खाऊची मांडोली
आई बाबाची तयार
साऱ्या चिल्यापिल्यां-
-साठी घरघरचि माहेर |
अशा उदंड बाल्याला
द्वाड सवंगडी साथ
कसे हसत खेळत
जात होते दिनरात |
मायबापाच्या संसारी
कष्टकरी हातभार
लावे पोरटे सोरटे
नाही वाटलाच भार |
हात हाताले जोडून
मायबाप भावंडांच्या
आणि सवंगडी सारे
गावगाडा हाकायाचा |
झाले मोठे नी परके
रीतभात जातपात
तुझे माझे ह्याचे त्याचे
काल खाल्ले रं एकात |
आज उठे गदारोळ
अन कालवे मनात
काय होते बालपणी
काय झाले तारुण्यात |
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा