ट्रंक

 




ट्रंक




घर कोणाचे कोणाचे 


मायबाप की लेकाचे 


पोर उजविली मागे 


तिने सांगावे कोणाचे |




येता माहेरास पोर 


तिला परकेच वाटे 


नाही एकही कोपरा 


जपे बालपण तिचे |




बालपण जपणारी 


नाही कोणतीही खूण


नाही आठवण तिची 


नाही खेळणी चुकून |




घरभर हा पसारा 


नव्या संसाराचा सारा 


नव्या मालकिणी साठी 


नव्या नवतीचा वारा |




एक म्हातारा म्हातारी 


थोडी अडगळ त्यांची 


त्यांच्या गोधड्या वाकळी 


लेक रमे त्या ठिगळी |




एक बाज तुटकिशी 


त्याच्या खालती ती ट्रंक 


त्यात बाळ चिंध्या साऱ्या


झोपे बाहुली निशंक |




त्यात गावले जन्माचे 


हवे नको ते ते सारे 


बालपण सख्या खेळ 


सुख जन्माचे साजरे |




जप इतकेच भाऊ 


माझी मातरे पितरे 


आणि देई मज दादा 


त्यांच्या मागे ट्रंक ती रे |




मले दुसरे नको रे 


आनी तुज्याकून काही 


जप जिवाले बाबा रे 


तूच बापमाय माही |


   *अँब्रोस चेट्टियार*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी