स्मृती
स्मृती
स्मृती पितरांच्या येता
मन हळवे होई ते
कैक कोपरे मनाचे
मग ओथंबून भरते |
एक एक धागा येई
दुज्या सोबतच आणी
सरता आठव दुजाची
त्याची तिजा साथ देई |
अशी लांबण लागोनी
मना भरतीच येते
हुंदक्यांच्या मागे सय
एकएकाची स्मरते |
सान-थोर सारे मग्न
तदी मनाच्या खेळात
असा दिन कारे येई
माणसाच्या आयुष्यात |
मायबाप बांधवांचे
उरे आठवाचे धागे
मागे फिरुनी पहाता
बेवारशीपण दिसे |
उभे आकांडतांडव
स्तब्ध एकजात आज
एरी घर डोक्यावर
आज कसे निपचित
त्या अबोलशा मुर्ती
आज हासतिच का ना
कारे भासे मजलागी
पाणी त्यांच्याही डोळ्यांना |
कैक आठवाच्या घडी
कैक पिंजून काढाव्या
तरी होईनात स्वच्छ
अश्रूधारांच्या गोधड्या |
त्यांची जाणवते ऊब
जणू बोलती त्या मला
नको रडू माझ्या बाळा
बोलताना ओला गळा |
हाच नेम सारा दिस
अन आठव जन्माचा
घेतो वर्षाचे वर्षाला
सर्वां भेटुनी अबोला |
मणामणाचे ते ओझे
पुन्हा हलके होतसे
सर्वां गळा भेट होई
नवे वर्ष फुलतसे |
एकमेकांची ती पूस
आज नव्याने पुन्हा ती
नवे नवे जोडायाला
पुन्हा जुने विसरती |
मग हलके हास्याचे
अन स्मिताचेही काही
आहो आम्ही तुझ्या साठी
नाती शाश्वत प्रेमाची |
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा