उक्किरडा
(केर टाकायला गेलो असताना तिथूनच वेचून खाणाऱ्या वेडसर भुकेल्या व्यक्तीला पाहून दुसऱ्या वेचणारणीनेच त्याला चहा आणून पाजला नी सोबत पाव खायला घेवून दिला.. हे पाहताना किती तरी भाव भावना येवून जात होत्या. भयंकर परिस्थितीत फुललेली माणुसकी )
उक्किरडा
त्या त्या उक्किरड्याचं बाबा
तुम्हा काय सांगू देनं
निजानीज झाल्यावर मी
हुडकाय जाते सोनं |
त्या त्या उक्किरड्याचं बाबा ...
तुम्हा कळंलका माझं येडं
जीवन साधंभोळं
रात्रदिवस मी जीव काढते
पोट भरंना यकवेळं |
त्या त्या उक्किरड्याचं बाबा ...
दिसभर मोडून मरून मी जगते
दिस ढळला की घरास वळते
हसते रडते दिवस काढते
कचरा वेचावयास जाते
लाज तुम्हा आणते |
त्या त्या उक्किरड्याचं बाबा ...
कधी सापडे वस्तू तुटकी
कापड चिंधी मडकी फुटकी
कधी भरे मग हात घाणिने
किळस शिसारी येते ..
त्या त्या उक्किरड्याचं बाबा ...
पहाट होता कामगार ये
हाकलुन मजला दूरवरी दे
त्यास मी सांगू काय जीवाचे
मनात रागे भरते
त्या त्या उक्किरड्याचं बाबा ...
जे जे मजला सापडते ते
भंगाराचे पैसे करते
कोण भिकारी तिथेच बसतो
घाण चिवडूनी तिथेच खातो
त्यास ही खाऊ देते..
त्या त्या उक्किरड्याचं बाबा ...
उक्किरड्याची सोबत मजला
आणिक सांगू काय मी तुला
माझ्या घरचा केर कधी मी
इकडे न येऊ देते
त्या त्या उक्किरड्याचं बाबा ..
ओला कचरा सुका वेगळा
नको असेल तो ठेवु वेगळा
प्रत्येकाचे मूल्य वेगळे
तसेच वर्गित होते
त्या त्या उक्किरड्याचं बाबा ..
शिकुन ही मोठे झाले नाही
ज्ञान कुणाला कळले नाही
हातभार ही सहायकारी
पुढे कधीच ना येते ..
त्या त्या उक्किरड्याचं बाबा .
त्या त्या उक्किरड्याचं बाबा ..
काही कवतुक नाही थोडं
त्याच्या योगे कितीक शिकतील
आयुष्याचे थोर धडे...
आज चला की एक होऊया
उक्किरड्याला दूर करूया
स्वच्छ करोनी हाताने या
लख्ख लख्ख हा समाज करूया ..
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा