*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा.*
वृत्तांत :
मंगळवार, दिनांक 09 एप्रिल 2024 रोजी,
कुसापुर-चिंचवली, भिवंडी.
*सामाजिक बहिष्कार, भेदभाव, अमानुष वागणूक इत्यादी प्रकाराविरुद्ध तक्रार .*
अर्जदार रामचंद्र शेलार, राहणार पनवेल. शिक्षित, नोकरी व्यवसाय निमित्त पनवेल येथे वास्तव्य. त्यांचे पालक मातापिता कोयना धरण प्रकल्पग्रस्त विस्थापित म्हणून ईतर कुटुंबांसोबत शासन निर्दिष्ट वसाहत म्हणून भिवंडी येथील चिंचवली जवळील कुसापुर या ठिकाणी 1962 साली येऊन वसले. ही सर्व कुटुंबे शेलार आडनावाची आहेत.. आज घडीला साधारण 80 बऱ्यापैकी नीटनेटकी घरे या वस्तीत आहेत. गावात सर्वासाठी मंदिर सभामंडप , शाळा सर्व काही आहे.
.... गावातील काही तीन चार कुटुंबे शेलार असून पाटील असे नाव लावतात. पूर्वापार पुढाकार घेऊन गावचा कारभार पाहत असावीत. परंतु गेली काही दशके सदर पाटील कुटुंबाची मक्तेदारी आणि वर्चस्व गावकऱ्यांना जाचक होऊ लागलेले दिसतात. गावात दब्या आवाजात याबाबत नाराजी आहे . शिकले सवरलेले लोक विरोध नोंदवतात तेव्हा दुरूत्तरे केली जातात असे समजते. गावात अधिकारपदांवर आणि ग्रामपंचायत, सरपंच निवडणुका इत्यादींवरही ह्याच निवडक पाटील कुटुंबांची पकड असल्याचे समजते. पिढ्यांनपिढ्या गावाने पुढारीपण दिल्याने आपण तेवढे श्रेष्ठ बाकी गावकरी कनिष्ठ असा भाव त्यांच्यात निर्माण होऊन बाकी सर्वांनी प्रथम आपल्या शेतात व कामात विनामोबदला राबावे, मदत करावी आणि नंतर आपले शेती व काम पहावे हे व असेच काही जाचक वर्तन ही पाटील मंडळी करत आले आहेत. जे गावाला रुचत नाही असे समजले. त्याबाबतीत उघड कोणी फारसे बोलत तरी रामचंद्र शेलार त्यांचे भाऊ, आईवडील इत्यादी मात्र या विरोधात रीतसर आवाज उठवत आला आहे. रामचंद्र यांचे वडिलांनी पाटलाच्या शेतात काम करायला ठाम नकार दिला होता.
रामचन्द्र शेलार यांच्या विनंतीवरूनअंनिस ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे यांनी रामचंद्र शेलार यांचे विनंती वरून कुसापूर, चिंचवली गावातील एकंदर परिस्थिती पाहण्याचा निर्धार केला. 9 एप्रिल रोजी सकाळी 9 पासून पूर्ण दिवस देऊन या प्रश्नाचा छडा लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रामचंद्र यांचे घरी भेटून आवश्यक माहिती घेतली त्यांचे कुटुंबीय , वयस्कर वडील पूर्ण माहिती देत होते. माईंनी राजाराम शेलार यांची भेट घेतली. संपूर्ण माहिती घेतली. त्यांना पाटलांनी वाळीत टाकले होते असे समजले. पण विरोध करणे त्यांना योग्य वाटले नाही. ते सहन करत गेले. रामचंद्र यांनी सदर विषय गावाबाहेर अंनिसपर्यंत वगैरे नेऊ नये असे त्यांचे म्हणणे होते. परंतू रामचंद शेलार यांनी स्थानिक पोला़ीस चौकीला याबाबत लक्ष घालण्याकरिता अर्ज केले आहेत. *जातपंचायती विरोधी कायदा असताना सामाजिक बहिष्कार विरोधात संरक्षण कायदा ह्या महाराष्ट्रात असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थेत पदे भूषविणाऱ्या जाणकार लोकांनी असे असामाजिक, अमानवीय, बेकायदेशीर कृत्य उघडपणे करावे ही शोचनीय बाब आहे.
गावातील सर्व मोठ्या कार्यक्रमांचे मुख्य पाटील, गावातील मंदिराचे सर्व हक्क पाटलांचे, गाभाऱ्यात त्यांच्या व्यतिरिक्त कोणी गावकरी जाता कामा नये , पाटील आणि त्यांच्या स्त्रिया सोडून ईतर सर्व गावकरी आणि स्त्रियांना गाभाऱ्यात मज्जाव. असे भेदभाव होत आहेत अशीही माहिती मिळाली. गावातील सार्वजनिक पूजेच्या, उत्सवांच्या वेळी तसेच पालखी मिरवणुक यांना मंदिराचे सभामंडप असताना पाटलांच्या वाड्यावर नेले जाते व गावकऱ्यांनी तेथे जाऊन दर्शन घ्यावे. नुकत्याच झालेल्या होळी समारंभातही ह्याची पुनरावृत्ती झाली.. असे अनेक जाचक , जबरदस्तीचे कार्य येथे होतात. राजाराम शेलार आणि रामचंद्र शेलार यांचे बंधु यांनी अंनिस कार्यकर्त्यांना गावचे मंदिर प्रांगण, सभामंडप इत्यादी दाखविले.
गावातील लोकांना भेटीच्या क्रमात पुढे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले पांडुरंग शेलार यांचीही भेट झाली . माईंनी कार्यकर्ते अजित डफळे यांचे समवेत त्यांची भेट घेतली. त्यांचे मते लोकांनी बदल स्वीकारायला हवेत पण ते हळू हळू होईल. लोक लगेच बदलणार नाहीत . मात्र त्याकरिता योग्य मार्गाने सतत पाठपुरावा व्हायला हवा.. अंनिसचे कार्यक्रम तेथे व्हायला हवेत . प्रबोधन होत राहणे आवश्यक आहे असे सर्वांनी एकमताने मान्य केले. गावातील भेटी झाल्यावर रामचंद्र शेलार त्यांचे बंधू यांचे सोबत अंनिस प्रतिनिधी माई वंदना शिंदे आणि अजित डफळे नजीकच्या पोलीस चौकीला ही गेले. तिथे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नाईक साहेबांची भेट घेतली. त्यांनी सर्व माहिती ऐकून घेतली. आणि आपण नुकतेच ह्या चौकीवर रुजू झालो आहोत हेही त्यांनी सांगितले. तसेच प्रबोधनाच्या कार्याला त्यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. लवकरच कुसापुर, चिंचवलीला अंनिसचा चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टीकोन तसेच *सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण कायदा* आणि *जादूटोणा प्रतिबंधक कायदा* या बाबत जनजागृती करण्याचा एक कार्यक्रम घेता येईल अशी व्यवस्था करण्याची रामचंद्र शेलार बंधू आणि समविचारी गावकरी मंडळींनी तयारी दर्शविली..
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा