साहित्य

जे वाचले जाते तेच संस्कार करते. अनेक साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके, षण्मासिके (अर्धवार्षिके), वार्षिके आणि पुढे ही कोणत्यातरी विचाराला वाहिलेली. कसला विचार? काही शाश्वत विचार? तर आता हे म्हणजे संशोधनाचाच विषय ठरावे.  

थोडासा अभ्यास केलातर लक्षात येते की साहित्य माथे फिरवते आणि साहित्य एखाद्या विचारामागे ही धावायला लावते. साहित्य कुतूहल जागवते , साहित्य प्रेरणा देते.. साहित्य मने घडवते, साहित्य मस्तिष्क सशक्त करते. म्हणून मोठमोठे साहित्यातील संशोधक म्हणावे, संत म्हणावे असे, महात्मे म्हणावे असे महान लोक आपापल्या परीने आपले जीवन एखाद्या विचाराला समर्पित करून तो विचार साहित्यातून रुजवित गेले. फुलवीत गेले. 

      ह्याचा इतिहास मोठा आहे . अभ्यास केल्यास थक्क व्हावे असा हा इतिहास असेल. त्याची काही उदाहरणे आपण डोळसपणे पाहायला हवीत अभ्यासायला हवीत. आज उपलब्ध असलेले साहित्य एकदा पाहावे आणि उहापोह करावा.  

      याच विचाराने मोठमोठी नियतकालिके ज्यांचे  नाव ऐकून असतो आपण. वाटले एखादे सुरू करावे आणि आपणही त्या महान द्रष्ट्याच्या कार्याचे थोडे फार ज्ञानामृत प्राशन करावे.. तर सुरू केले.. आणि हाती पडताच मुखपृष्ठ , मलपृष्ठ त्याची रंगसंगती अंतर्गत रंगसंगती , छपाई योजना अक्षरे रकाने मथळे चित्रयोजना वगैरे पाहून श्वास कोंडला.. पत्रिका उघडविशी वाटेना.. एरव्ही रस्त्यावर पडलेले वर्तमान पत्राचेही चिटकुर उचलून वाचावेसे वाटेल पण हे मात्र अगदी अनेस्थेशिया दिल्यावर माणूस शुद्ध हरपून काही काळ का होईना गपगार व्हावा तसे झाले.. उत्सुकताचाच मारून टाकण्यात प्रचंड यश मिळवलेल्या हेकेखोर म्होरक्याने दिलेल्या आदेशाबरहुकुम फक्त पत्रिका उचलून उघडुन यंत्रवत वाचावी आणि त्यातील काही मुद्यांवर चर्वितचर्वण करावे असे लोक करताना दिसतात. मग एखाद्या त्या क्षेत्रातील गाजलेल्या नेत्या वा नेत्रीचे जणू पाठीराखे वा घोळक्याचा भाग होऊन मागेमागे चालावे. स्वतःचे काही जोडू नये,  बोलू नये.  विरोधकांचे अर्थात माणुसकीचे विरोधक सोडून फक्त विचार वेगळे असणारे विरोधकही त्यांच्या चर्चेत विशेष येत नसतात.  हे  बुद्धिभेदाचे भयंकर उदाहरण सर्वत्र पाहायला मिळते. बरे हे न वाचताच मागे जाणारे नव्हे बरे. उच्चशिक्षित पांढरपेशे उच्चपदस्थ वगैरेंचे ही हेच पाहायला मिळते. समाजात बहुतांश असाच वर्ग पाहायला मिळतो. जे अतिशय अंतर्मुख करणारे आणि मन विषण्ण करणारे आहे. 

परंतु थोडे मागे जाऊन ह्या लेखनास्त्राचा सदुपयोग करून  क्रांती घडविलेल्या महानुभावांचा विचार आणि त्यांचे लेखन याचा अभ्यास केल्यास त्यांच्या कर्म वचन वाणी यांची दिशा एक असल्याचे निदर्शनास येते. इतके खरे असणे सहजच जमत नसते त्याला अंतरातून खूप निर्मळ, निरागस तसेच पक्क्या बैठकीचे पिंड असावे लागत असेल नई. नाहीतर खूपच लोक असे ह्या मार्गावर सहज दिसले असते. काहींनी संपूर्ण मानवजात ही प्रकृतीची लेकरे आहे आणि आपण जे काही थोडे अधिक  ज्ञान मिळवले आहे ते सर्वांना जागृत करण्यास त्यांच्या पर्यंत पोहोचविणे हे आपले जीवित कार्य आहे असे समजून कार्य करतात बोलतात लिहितात जागृती करतात. ते हळू हळू समाजाची पकड घेते. तसेच दुर्जनांचेही असतेच त्यांचे मात्र थोडेसे अधिक घट्ट विणीचे कार्य असते. तिथे मात्र लोक बळी पडून येतात. बुद्धिभेद होऊन येतात. मात्र इकडे लोक जागृत होऊन येतात. जीवावर उदार होऊन येतात. आणि मोठे बदल समाजात घडताना आपण पाहतो. 

तद्वतच समाजास दृढ करण्यासाठी आवश्यक असणारे संस्कार हे बालपणापासून घराघरांतून यावे असे ही आवश्यक असते. आणि लहान मुलांच्या भावविश्वाचा विचार करून त्यांच्या मानसशास्त्राचा विचार करून उत्तम अभ्यास असलेले लोक ह्या वेगळ्या गटासाठी उच्चकोटीचे साहित्य निर्माण करतात. आणि जे मन, बुद्धीवर कोरले जातात. समाजासाठी देशासाठी असे संस्कार करण्यासाठी साहित्यिकांची प्रचंड गरज असते.  जेणेकरून फुळण्या पूर्वीच भरकटण्याची सोय करून  ठेवलेल्या जगात योग्य वेळी योग्य संस्कार करणारे साहित्य आणि शिक्षणोपयोगी मन बुद्धी घडवणारे विचार देणारे माहितीपूर्ण साहित्य इत्यादी निर्माण करण्यासाठी अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे काही जण आपल्या जीवाचे रान करून हे महत्कार्य साकार करत असतात. मात्र सहसा आज असे कोणी दिसत नाहीत. ही खूप मोठी निराशाजनक खंत मन विदीर्ण करते. मात्र मना मस्तिष्क बिघडवणारे बरेच काही उपलब्ध करून देणाऱ्यांची मात्र आज सद्दी असलेली दिसते. ते कोणत्याही वयाकरिताचे साहित्य असो सगळीकडे मानवतेला घातक दुही माजविणारे सूत्र बेमालूम गुंफलेले दिसते. अशा प्रसंगी पुढच्या पिढ्यांना डोळसपणे उत्तम संस्कार देण्यासाठी सच्या सहृदयांनी पुढे येणे ही काळाची गरज आहे.. 

साहित्य ह्या शब्दाची फोड करून पहा .. पहा बरं

काय मिळते ? आणि आम्हालाही सांगा ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी