महाबळेश्वर पुराण पुढे सुरू
तर पहिला दिवस
रात्रभर प्रवास करून अनेकदा सीटवरून शिटा घसरून सावरत, झोप ती कशी मला बाहेर येणे अशक्यच म्हणा,तो आणि वेगळाच रोग आहे,सवय आहे. असे पोहोचलो." लास्ट स्टॉप महाबळेश्वर " तर सांगितलेले ड्रीमलँड हॉटेल काही दिसेना. "उधर नई जाताय. इधरही उतरो, जल्दी करो".
तिकडून चिडक्या स्वरात ऑर्डरवजा सूचना आली. 'अमके तमके हाटेलवाले इकडेच उतरा नी फलाने फलाने हाटेलवाले गाडी में बैठो' अशी खरमरीत विनंतीवजा सूचना उतरता उतरता ऐकली. अणि पोरगं आपलं मराठीच होतं. उतारू मात्र काही मराठी काही परभाषिक असतील. वाद घालण्यात इथे तरी काहीच अर्थ नव्हता खाली उतरून पाहू म्हटले नी उतरलो. मला गेले वर्षभर पायांना त्रास होता आता थोडे बरे होते पण अजून पूर्ण बरे वाटत नव्हते तरी मनोमन मुद्दाम हे आव्हान स्वीकारून प्रवासाला तयार झालो होतो.
ठरवताना अगदी पहिल्यांदाच येत असल्याने सहसा गड किल्ले आणि मंदिरे देवस्थाने वगळून प्रवास करू असे ठरले होते. जेणे करून जास्त पायऱ्या उतर चढ करणे टाळता येईल असे ठरवून प्रवास निश्चित केलेला होता. पण.. असो.
तर बस मधून उतरताच आपल्या महाबळेश्वरच्या हवेशी मातीशी तादात्म्य पावू देतील ते कुठलेही टॅक्सीवाले कसले ? चिकटले. एकाच वेळी चहूकडून भारतला जायचयं का ? लई लांब आहे. पस्तावा होईल. किमान एकवीस वेळा तरी हा एकमेव प्रश्न कानी पडला. आणि आपल्या मराठी माणसाचे पाहुणचाराचे अगत्य वगैरे अपेक्षित उतरलेल्या मला त्यातील किमान चार लोकांना तरी हुज्जत घालून वाट मोकळी करून घेत, श्वास घेण्यास उसंत मिळवावी लागली. 'बस सोडेल तिथून मोजून तीन मिनिटांवर हॉटेल आहे', म्हटलेले कानात वाजत होते. अजून मागेच चिकटलेल्यांवर जरा तोंडसुख घेत त्यांनीही परतफेड केल्याची पावती देत आपला समोर दिसणारा रस्ता इंच इंच पाऊल पुढे टाकत निघालो. थोडे पुढे गेलो आणि एक चाचाजान बसलेले होते त्यांना "राही हॉटेल ? " विचारले तर ते म्हणाले "हे काय समोर, असेच पुढे जावा एक मिनिटांवर आहे की ". त्यांना धन्यवाद देत आणि बरे झाले टॅक्सी नाही पकडली असे पुटपुटत पुढे निघालो. तर एकच मिनिटांवर राही हॉटेल दिसले.. हॉटेलात चौकशी करता समजले थोडा वेळ थांबावे लागेल. आम्ही तशा तयारीतच होतो. म्हटले सकाळचे चहापान उरकावे. तिकडे मिसळ पाव आणि काही तरी होते. आम्ही आपले सादा डोसा आणि वाडा सांबार मागवला. ठाणे मुंबई सोडून इतर ठिकाणी इकडचे पदार्थ खाल्ले तर कशी अद्दल घडत्र्याचा वस्तुपाठ मिळाला. मुकात त्यांनी वाढलेले खाऊन पाहायला हवे होते. इकडे सांबार गोड असू शकतो. ( आम्ही घरी गोड सांबार करत नसतो ) पण हिरवी व नारळाची चटणी सुद्धा गोड . गोड म्हणजे एक्स्ट्रा गोड. बरं मेदु वडा उडदाच्या डाळीचा करतात. इकडे चक्क थालीपिठाच्या भाजणीचा वडा अगदी तोंडात घालवेना. रात्री प्रवास म्हणून दुपार सायंकाळपासून जपून खाल्लेले म्हणजे नाहीच. आणि सकाळी गाडीने सोडल्यावर खाऊ म्हंटले तर हा अनुभव. असो. होते असे सुरुवातीला नंतर सर्व चांगले होत असते. असावे. मानावे ..वगैरे..फिदी फिदी ..दोघे टेबल वर हसत होतो. मी अर्धा सोडलेला वडा तिने संपवला तेव्हा तिला धन्यवाद दिले. दरम्यान वेटर दादाला गोड चटणी नको तिखट काही आहे का विचारले तर हिरवी चटणी मिळेल म्हणाला आणि तीच हिरवी चटणी आणून पुन्हा पुढ्यात ठेवली. आम्हाला आता हसू आवरत नव्हते. मग तिने ते संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यापदार्थांची किंमत मात्र ठाण्यामुंबईप्रमाणेच लावली होती. आता लिहिताना मनात आले की किचन मध्ये जाऊन किमान चटणी ची रेसिपी शिकवायला हवी होती. पुढील वेळी नक्की प्रयत्न करीन . (याचा अर्थ पुढचे सर्व नीट झालेले होते बरं?.) आमचे खाऊन? होते तेवढ्यात रूम तयार आहेत अशी वर्दी आली. registration process करून रूम मध्ये आलो आणि एकदम wow ! वाटले.
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा