अगतिक धरा 


शेवटी वैतागून पृथ्वी म्हणाली

चला निघा बाबांनो इथून  

आता तुमचं तुम्हीच पहा, पुढे व्हा 

राहू नका. इथे तुम्ही राहू शकणार नाही 

या पुढचे येणारे दिवस काही तुम्ही 

सुखाने पाहू शकणार नाही

तुम्ही साहू शकणार नाही ...

मलाच माहीत ते काय असते 


धुराचे लोट, अग्नीचा जाच,

आणि वायूंची घुसमट, 

थपथपीत भूमी आणि रटरटते अंतरंग

घोंगावते वेडे वारे, 

माझ्या त्वचेवरील रसरशीत फोड 

नी ठसठसणाऱ्या जिवंत जखमांच्या खपल्या

तरी, सगळे सगळे साहून 

सूर्याने ओकलेल्या 

ह्या ह्या काळया पांढऱ्या राखेतून तुमच्यासाठी, 

हो हो तुमच्यासाठीच ही हिरवाई निर्माण केली होती 

आणि तुम्हीच त्याचा फक्त विध्वंस चालवलात ? ... 

शी ss वीट आलाय मला आता .. 

आता माझे तरी कितीसे आयुष्य राहिले आहे ?

माझे असे जे काही होते नव्हते ते 

सर्वस्व पणाला लावून मी तुम्हाला जगवले आहे ... 

पण, पण मनमोहक मृदेच्या सुगंधाने दरवळणाऱ्या माझ्या अंगाखांद्यावरील माझी हिरवाई नष्ट करून 

पुन्हा सूर्याने दिलेल्या काळया पांढऱ्या राखेत मला परिवर्तित करू इच्छिताय दुष्टांनो... 

नाही नाही ! 

तसे  होताना पाहायला तुम्ही शिल्लक उरणार नाही ..


उरले सुरले जीवन,  माझे मला, जाईल तसे 

माझ्या, अमानवी लेकरांसोबत घालवायचे आहे.. तुमच्यासाठी मात्र प्रकृती नी जीवन पोरखेळ आहे.

माझ्याकरिता मात्र लेकरांच्या बागडण्यात, संघर्षात जीवन-सुख सामावलेले आहे

जीवन म्हणजे काही पोरखेळ नाही, 

ती एक जबाबदारी असते  

एकाकडून दुसऱ्याला सोपवायची रखवालदारी असते  

तुमचे जीवन तुम्हाला संधी देते, 

त्याला मर्यादाही आहेतच की 

पण हेच जीवन मर्यादेत राहून अमर्याद कसे करावे 

हे शिकवायलाही प्रकृती तयार असते 

काही शिकतात , प्रयत्न करतात , जीवन फुलवतात, 

मला आनंदित करतात, गौरववान्वित करतात

मात्र तुमच्यासारखे स्वार्थी अप्पलपोटे लोक 

सगळ्याची राख करतात,  माती तरी लाखमोलाची, उपयोगात येते, जीवन फुलवते मात्र नाही तुम्ही मुद्दाम राख करता... सर्व प्रकृती लक्षणे संपवता... म्हणून,

म्हणूनच तुम्ही चालते व्हा येथून, 

त्वरित, लागलीच, ताबडतोब .. 

माझं मी पाहून घेइन ... 

.....म्हणत पृथ्वी फुत्कारत होती 

चडफडत, धडपडत होती, बडबडत होती 

आणि बेफाम आपल्या मार्गाने धावत होती ....

     *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी