माया
🙏
पँडेमिक काळात एक भर ओसरल्यावर लवकरच शाळा सुरू होणार हा आनंद अवर्णनीय असा होता. पालकांनाच शिक्षकांना केव्हा एकदा भेटतो पाहतो असे झाले होते. ऋणानुबंधाच्या इतक्या रंगीबेरंगी चित्रांनी नटलेला असा हा काळ होता. मग विद्यार्थ्यांचे काय झाले असेल ? याची आपण कल्पना करू शकतो. विद्यार्थी आणि शिक्षक हा एक वेगळाच संबंध मुलांच्या मनाच्या कोपऱ्यात घर करून असतो. आपल्या शिक्षकांना इतक्या कालावधीनंतर भेटायची आतूरता शब्दांत बांधता येणे तसे अवघडच. तसेच शाळा, शाळेची इमारत जिथे पाहायला दुर्मिळ झाली होती तिथे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राचार्य सर्वांना केवळ पाहता येणे हाच काय तो एक मोठा सोहळा बनला होता. आणि सर्वच कसे हळवे झाले होते. त्याचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न येथे कवीने केला आहे. जरूर पाहावे आणि आपलेही अनुभव सामाईक करावे. हा काळ पाहिलेल्या आपल्या पिढ्यांकरिता हा एक मोठा धडा बनून राहिला आहे . खचितच सर्व सहृदय जन नखशिखांत हादरले होते आणि बदललेलोही आहोत. सर्वांना उत्तम आयुरारोग्य आणि अभिष्ट चिंतून ही रचना सादर करत आहे.
माया
फुलली शाळा
चल बाळा
गोपाळांचा
जमला मेळा
आठवीनी पुढची
मुले आत गेली
बाकीची प्रवेशाला
रोखून ती धरली
हिरमुसली ती
हिरमुसली ती
खालमुंडी मुसमुसु लागली
प्रवेशाला इवली इवली
पाऊले थिजली
शिक्षकांच्या दर्शनाला
चिमुकली मुकली
वॉचमन थकला सारे
प्रयत्न करून
शेवटाला वर्दी दिली
प्राचार्यांना जाउन
शिपाईदादा आला जशी
सुचना घेउन
शिक्षकांना साऱ्या एकदम
आले गहिवरुन
रांगेत आले सारे जण
मास्क घालुन
एक हात अंतरावर
उभे झाले सारे
त्यांना पाहुन मुले उभी
रांगा धरून
चेहेरे सारे संकोचाने
संभ्रमित होते
लहानग्यांच्या चेहेऱ्यावर
प्रश्नचिन्ह होते .
काय करावे कोणालाही
सुचेना काही
डोळे सारे भिरभिरत
शोधत होते काही
बाल वर्गाच्या शिक्षिकेने
सोडविला पेच
सर्वात पुढे उभ्या झाल्या
उतरवून मास्क
एकच माजला गदारोळ
साऱ्या मुलांत
किंचाळून, हसुन, ओरडुन
झाला आनंद व्यक्त
मिनिटभर शाळा सारी
गेली दणाणून
मायाभरल्या नजरा वाहती
दोन्ही कडून.
मोठ्या मॅडम आल्या पुढे
छडी घेऊन
'अंतर वाढवा ' आदेश केला
छडी उंचावून
अंतरावरचे शिक्षक
झाले आणखी दूर
सर्वाच्याच मनामध्ये
माजले काहूर
मुलांकडे तोंड करून
उभ्या जाहल्या,
'फॉलो मी ' म्हणत
मास्क काढत्या जाहल्या.
घडले होते आश्चर्यच
सर्वाच्या लेखी
आनंदाची पखरण
सर्वांच्या मुखी.
मास्कमुखी मुले सारी
पाहती टकमका
डोळेभरून पाहून घेती
आपल्या शिक्षका .
शिक्षकांना ही आता
झाले अनावर
वाहू लागले पाहून बाळा
मायेचे पूर
झर्रकन प्राचार्या
मागे फिरत्या झाल्या
मास्क घालुन शिपायाला
इशाराही दिला.
क्षणभर माया होती वाहत
दोन्ही कडुन.
अचानक तीन टोल
पडले दणाणून
साऱ्यानी हात
जोडले भारावून
गगनात मावेनासे
झाले समाधान
प्रार्थनेला सारी सावध
सज्ज झाली
पालक मुले शिक्षक आणि
शाळा रंगली
विश्वशांतिच्या प्रार्थनेत सारी दंगली
विश्वशांतिच्या प्रार्थनेत सारी दंगली
विश्वशांतिच्या प्रार्थनेत सारी दंगली.
***©अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा