कामाचंं बोला
कामाचंं बोला
ऐका मायबाप जन
जनतेची कानगुज
आसवांचे कारणास
जाणुनीही साळसूद
न्हाई मी कुनाची कुनी
मला नातं जोडू नका
तुमच्या कामाचं बोला
फुका वाफ सोडू नका
सरकारी जाऊन बसला
धाडलं तुम्हा कुनी
हात जोडून दारी फिरला
आता झाला धनी
तुमच्या बुडाला माझी
मताची वो खुर्ची
नालायक निवडाय का मी
घाम पाडला खर्ची
मतं मागायाला येता
मालकाच्या दारी
मनाजोगं काम होता
मूर्ती पाठमोरी
कवर असं चालायाचं
माझं दिस कधी याचं
माझा सेवेकरी गडी
ऐकायाचा कधी ..
छान छोक तुमची सारी
आमच्याच जीवावर
आमच्याही साठी आना
कधी भाकर चतकोर
जनतेची का देशाची
फिकीर तुम्हाला
ढुंगणावर ठिगळं आमच्या
कसं गाठू शाळा
फुलापरी दरवळे
लेकरांनी वसे गाव
त्यांच्या विकासाची चिंता
निर्माल्याचे काय भाव
कोणी एक दीपस्तंभ
होतो दाही दिशासाठी
त्याला नाहीसे करण्या
झटतात का करंटी
कोन असतील अगा
उरफाटी काळजाची
दयामाया त्यांना कानी
आपल्याच बांधवांची
सेवेकरी अन् पुढारी
आज नावाला होतात
मोठ मोठे संत झाले
आपल्याच ह्या मातीत
आज कोणी अवलिया
व्हावा असा संत मोठा
नाठाळाला कायद्याने
मिळो वेळेवरी सोटा
असे कायद्याचे राज्य
माझ्या मताने बा यावे
पुन्हा कोणी दुष्ट क्रूर
माजण्यास ना धजावे....
*©अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा