पुरस्कार सोहळा शब्दवृत्त १

 क्रमशः- सादर

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

शतकवीर,आधारस्तंभ पुरस्कार आणि  लेखनशिबिर सोहळा 

शब्दवृत्त : 

     शनिवार रविवार दिनांक १४/१५ सप्टेंबर २०२४ रोजी, 

महाराष्ट्र अंनिसचा, अंनिस कार्यकर्ते यांचा सन्मान सोहळा तसेच  शतकवीर,आधारस्तंभ पुरस्कार प्रदान सोहळा आणि कार्यकर्त्यांकरिता लेखनशिबिर असा भरगच्च द्वीदिवसीय कार्यक्रम साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, माणगाव, जिल्हे रायगड येथे जोशात साजरा झाला.

     महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र म्हणजेच अंनिवा होय. अंनिवा संपादक मंडळाने आणि म.अंनिस राज्यकार्यकारी मंडळाने वार्तापत्राचा प्रचार प्रसार करणाऱ्या अंनिसच्या सक्रिय सदस्यांचा शतकवीर आणि आधारस्तंभ अशा पुरस्काराने सन्मान करण्याचा सोहळा आयोजित केला होता.  आकर्षक भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्काराचे महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातून नागपूर ते मुंबई तर नाशिक ते सोलापूर असे एकूण 90 पुरस्कारार्थी मानकरी होते. हा कार्यक्रम फक्त अंनिस सदस्यांसाठी असला तरी पुरस्कारार्थी आणि कुटुंब तसेच त्यांचे शाखाकुटुंब असे एकूण 200 जणांनी नावनोंदणी केली होती. प्रचंड प्रतिसाद पाहून त्यानंतर नावनोंदणी थांबविण्यात आली होती. पण प्रत्यक्ष मात्र 230जण असे प्रचंड संख्येने सदस्य  कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर, माणगाव येथे 14 आणि 15 सप्टेंबर 2024 या दोन दिवसात आयोजित या कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद हा अविश्वसनीय तसेच अविस्मरणीय ठरला. याचे श्रेय पूर्णपणे अर्थात उत्तम आयोजन आणि नियोजन करणाऱ्या संपादक मंडळास आणि स्थानिक जिल्हा शाखेस जाते. कार्यक्रम पत्रिका पाहून याची कल्पना सहज यावी. प्रत्येक सत्राचे बारकाईने केलेले नियोजन हे पुढील आयोजनांस सर्वांना नक्की मार्गदर्शक ठरेल. 


👉सर्वप्रथम विविध स्थळाहून येऊन पोहोचणाऱ्या अंनिस सदस्यांचे आवारातील उपस्थित सदस्यांनी सहर्ष आवर्जून मार्गदर्शन केले. वाहनातून उतरल्यावर गावच्या घराची आठवण करून देणारा लाकडी अडणा बाजूला करून आत प्रवेश घेतानाच साने गुरुजींचे मातृहृदय आणि गांधीजींचे खेड्याकडे चला वचन दोन्ही एकदाच आठवत होते.  का कोण जाणे मन भरून येत होते. साने गुरुजींच्या या स्मारकात जणू माहेरी आल्यासारखे वाटत होते, आपल्या माऊलीच्या कुशीत आल्यासारखे वाटत होते. रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडे, डावीकडे लाल जर्द जास्वंद फुलला होता उजवी कडे हिरवे आणि रंगीबेरंगी पानांनी फुललेली झाडे, हिरवा पणानी डवरलेला अनंत असे  मधून जाणाऱ्यांना अवचित मार्गदर्शन करत होती. पुढे एका झाडावर चढून डोलणारी निळी जांभळी गोकर्ण , अपराजितेची वेल, विस्तीर्ण आवारातील विविध इमारती आणि पुष्पल्लवित, वृक्षवल्लरिंच्या सानिध्यात, सकाळी उत्साहाने येऊन पोहोचणाऱ्या सदस्यांचे कुतूहलपूरीत मन प्रफुल्लित करत होती. रस्त्यात दुतर्फा भरगच्च फुललेली तुळस, मनमोहक सुगंधाने वातावरण प्रसन्न करत होती.. इतकी भरगच्च तुळस तिच्या मंजिऱ्या नुकतेच बाळसे धरत असलेल्या अशी क्वचितच इतरत्र कधी कोणी एवढ्या संख्येने पाहिली असतील. खाली पानफुटीचे माजलेले जंगल पाहून मला आनंद झाला मी पानांवरून हात फिरवला आणि खाली पसरलेली टुणटुणी ही पहिली . सभोवतालचे हिरव्या,  पिवळ्या आणि लाल crotons चे कुंपण वातावरणात आणखी रंग रंग भरत होते. इथे पेरूचे आंब्याचे असे अनेक फळाची झाडे हिरवी कंच पावसात न्हाऊन उभी होती. पण सदस्यांच्या स्वागतासाठी मात्र पाऊस जणू पूर्णपणे थांबला होता. रस्त्याने पुढे गेल्यावर मधोमध उभ्या असलेल्या वास्तूतील कर्त्या पुरुषाप्रमाणे स्वागतास सज्ज असलेला भलामोठा धीरगंभीर हिरव्यागार पानांनी डवरलेला वृक्षराज वटवृक्ष आपल्या डोलणाऱ्या पारंब्यांनी सर्वांचे स्वागत करत होता. त्याच्या समोरच दिमाखात उभ्या असलेल्या सभागृहाचे आवारात अंनिस-अंनिवाचा नावनोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला होता. तिथे हळू हळू येणाऱ्या अंनिस सदस्यांची रांग जोम धरत होती. रीतसर नावनोंदणी करून झाल्यावर सदस्यांना ओळखपत्र, लेखन साहित्य, सोबतच आंतरभारती अनुवाद केंद्राचा मायमावशी अंक भेट म्हणून आणि अल्पोपहार आणि भोजनासाठीचे कूपन्स सुपुर्द करण्यात आले. आम्हा सदस्यांना जिल्हा विचारून  निवासाची सोय असलेल्या इमारतीचे नाव सांगण्यात आले ते मी दिलेल्या लेखनसहित्यावर लिहून घेतले. ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पालघर शाखांच्या पुरुष सदस्यांना  A V हॉल देण्यात आला तर वरील जिल्ह्यातील महिलांना मृणाल गोरे बंगलो मधील जागा देण्यात आली. अशा प्रकारे सर्व जिल्हावार, पूर्वनोंदणी झाल्याप्रमाणे, सदस्य संख्या, पुरुष, महिला आणि असल्यास लहान मुले असे सर्व बाबी विचारात घेऊन विभागणी करून निवासाची सोय करण्यात आली असावी. आणि ती पूर्णतः अनुरूप व योग्य होती हे नंतर सिद्धच झाले. निवासाच्या नियोजित ठिकाणी सोबतच्या बॅगा आणि सामानाची सोय लावून लगेच प्रवासाचा शीण घालवण्याकरिता चहा आणि अल्पोपहार घेण्यास जाण्याचे आवाहन नावनोंदणी विभागाने केले. अंनिसच्या सक्रिय कार्यकर्ते दोनही सुहास आणि सहकारी आपले मार्गदर्शनकार्य सुहास्य वदनाने चोख बजावत होते.  एव्हाना सुहास द्वयी सुहास यरोडकर आणि सुहास पवार,  राहुल थोरात, त्रिषला ताई, आशा ताई , अण्णा कडलास्कर सर , रमेश माने सर , राऊत सर आणि अनेक ओळखीचे आणि काही मला नवीन असलेले चेहरे आम्ही सर्व भेटलो. आम्ही म्हणजे अंनिस कार्यकर्ते  अजित डफळे दादा , राहुल शिंदे , समीर शेख आणि डॉक्टर जाधव , आणि मी असे सर्व कार्यकर्ते एकत्र चाहापानाला गेलो खरे पण नंतर सगळ्यात मिसळून गेलो.  तिथेच विविध जिल्ह्यातून आलेल्या आणखीही काही अंनिस सदस्यांची ओळख झाली. त्यातील काही जण तर खूपच लांबून आले असल्याने त्यांना प्रवास एक दिवस अगोदर सुरू करावा लागला होता. आदल्या रात्रीच ते येऊन ठेपले होते. रात्रीचे जेवण घेऊन त्यांनी रात्री सोय केल्या प्रमाणे आराम केला होता. सकाळीच त्यातील बरेच सदस्य परिसरातील टेकडीवर निसर्ग भ्रमंती, जंगल ट्रेककरिता जाऊन आले होते. त्याबद्दलची रोमांचक माहिती घेत घेत चविष्ट उपमा आणि चहाचा अल्पोपहार केला.  आणि लगोलग कार्यक्रम पत्रिकेनुसार सर्वजण मुख्य सभागृहात प्रथम सत्राच्या उद्घाटनाकरिता जमलो. 

१*                       .....क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी