मर्दपणाच्या अंधश्रद्धधा
"मुलांनी, पुरुषांनी आता मर्दपणाच्या अंधश्रद्धेतून बाहेर पडायला हवे ". प्रख्यात ज्येष्ठ कवयित्री नीरजा.
....साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर, माणगाव, येथे साजरा झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता सन्मान सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी आपले विचार मांडले.
मुलांनाही रडू येते, तेही हळवे होतात, प्रसंगी तेही उन्मळून पडतात, मोडतात. अशा वेळी मर्द को कभी दर्द नाही होता वगैरे फुकाच्या वल्गना करून एखादे जीवन कायमचे कोमेजून जाते. मुलांनी रडायचे नाही खंबीर राहायचे . असे अविचारी विचार त्यांच्यावर क्रूरपणे का लादायचे ? बहिणीचे, घराचे, कुटुंबाचे रक्षण, भरणपोषण ही मुलाची जबाबदारी आहे , हा विचारच तकलादू आहे. तसे पूर्णपणे कोणा पुरुषाला जमले आहे का ? हा ही एक मोठा प्रश्नच आहे. हा संशोधनाचा विषय आहे. मात्र एक निर्विवाद की ही जबाबदारी एकत्रितपणे सर्वांची असते. आणि तशी ती समाजात निभावली जातेही. क्वचितच एखाद्या पुरुषाने, मुलाने घरदार, कुटुंब, भावंडे अशी सर्वांची जबाबदारी एकट्याने पेलली असे दृश्य दिसेल .. दुर्मिळच आहे ते . पण एखाद्या मातेने पतीमागे मुलांचा सांभाळ केला बहिणीने पित्यामागे, पालकांमध्ये भावंडांचा सांभाळ केली अशी उदाहरणे समाजात इतिहासात खूप आहेत. उलट मातेचे निधन झाल्यावर पित्याने दुसरे लग्न केले आणि मुलांचे हाल झाले. किंवा मातेच्या मृत्यू नंतर पिता व्यसनात बुडून गेला आणि मुलांच्या आयुष्याची धूळधाण झाली असे अनेक प्रसंग समाजात घडलेले प्रत्यक्ष आपण पाहतो ऐकतो. त्याउलट
महिलांवर आणि समाजात दुबल घटकांवर अत्याचार करणाऱ्यांत मात्र पुरुषांचा वरचा क्रमांक सतत दिसून आला आहे. याच्या उलट चित्र सहसा पाहिल्याचे आपल्या ऐकिवात नाही..
स्त्रियांवरील अत्याचार सतत होत राहिले आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आयुष्य जगणाऱ्या स्त्रीलाही दुय्यमच स्थान कायम दिले गेले आहे..
..हल्ली बलात्काराच्या घटनांनी तर उच्छादच मांडला आहे. आजच्या काळात मुलांपेक्षा मुली सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे.
अशा वेळी एरव्हीही स्त्रीशी अथवा एकूणच सौजन्याने कसे वागावे याचे संस्कार जणू नसलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीने आजच्या सक्षम झालेल्या स्त्रीशी कसे वागले पाहिजे ? ह्याचा जरूर विचार केला पाहिजे. हजारो वर्षे चूल आणि मूल हेच स्त्रीला दिलेले जगण्यासाठीचे कमाल स्वातंत्र्य होय. स्त्री कितीही प्रगत झाली तरी तिच्या घरातील जबाबदाऱ्या आजही वाटून घेतल्या जात नाहीत. काल पर्यंत पुरुषाने कमावून आणायचे आणि स्त्रीने घर सांभाळायचे असा काही परंपरागत संस्काराचा भाग होता मात्र तोही स्त्रीने कसोशीने सांभाळला.. आजही स्त्रीकडून तशाच अपेक्षा असतात . आजची स्त्री कुटुंबासाठी हातभार म्हणून पुरुषाला मदत म्हणून बाहेर काम करून येते तरी घरातील कामे तिची वाट पाहत असतात. असे का ? आधुनिक स्त्री आपल्या क्षेत्रात पुरुषापेक्षा अधिक कार्यक्षमतेने स्वतःला सिद्ध करते. आज ती पुरुषाने केलेली सर्व कामे सक्षमतेने पार पाडते. पुरुषाला त्याच्या संसारात हातभार लावते . असे असतानाही, त्याच्या जबाबदारीत मदत करत असतानाही पुरुषांनीही स्त्रीला तिच्या कामात मदत केली पाहिजे असा साधा विचारही समाजाला शिवत नाही.. पुरुषाने आपल्याच घरात, घरकामात आपल्या स्त्रीला आतापर्यंत आखून दिलेल्या कामात केली मदत तर काय बिघडते ? हे पुरुषाचे काम आणि हे स्त्रीचे काम अशी विभागणी आजही का ?
काल पर्यंत फक्त गृहिणी असलेली स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात सर्वच आघाड्यांवर पुढे असताना पुरुषाने घरातील काही कामे करून किंवा स्त्रीच्या भूमिका थोड्याफार निभावल्या तर काय वाईट आहे अथवा जमलेच तर पूर्णवेळ गृहस्थ बनून घर सांभाळायला काय हरकत आहे? आज क्वचित असे काही तरुण तयार होत आहेत ही आशादायक आणि चांगली गोष्ट आहे. पण पुरुषांनी स्त्रियांची बाजू समजून घेऊन तिच्या सोबत घर, कुटुंब सांभाळायला हवे. नेहमी स्त्रीने पुरुषाच्या मागेच राहावे असा विचार न करता पुरुषाने आता स्त्रीला आपल्या सोबत आणावे. स्त्रीने त्याची जबाबदारी शिरावर घेतली आहे, संसारात त्याची साथ केली आहे. तेव्हा पुरुषाने आयुष्यात तिच्या सोबत पाऊल पुढे टाकावे यात गैर काय आहे ? "अंधश्रद्धा निर्मूलन सारखे समाज जागृतीचे करू करण्यात ही स्त्रियांचा पुढाकार पाहून खूप अभिमान वाटतो". स्त्रिया पुढे आल्या की कोणतेही कार्य झपाट्याने पुढे जाते, व्यापक होते. कारण त्यांची नाळ समाजाशी अधिक जोडले गेलेली असते. कार्यकर्त्यांच्या सन्मान सोहळ्या प्रसंगी बोलताना उपस्थित महिलांची संख्या पाहून कवयित्री नीरजा यांनी खूप समाधान व्यक्त केले..
.. *अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा