थोर शिक्षक
थोर शिक्षक
धोतर लेवून,
लेखणी, चष्मा घेऊन
गोमुखासनात बसणारा अवलिया
जगाला देतो अनमोल शांतीचे ऐश्वर्य़...
भराभरा लिहित जातो
आपल्या गिजमिज्या अक्षरांनी
चळतीच्या चळती, तावच्या ताव...
कशा कळतात मुद्रकाला कोण जाणे
त्याच्या कागदाचे भाव .....
जगभर लोक वाचतात आतूर होऊन
पुढे काय, पुढे काय... ..
सांगतो आत्म्याला सुखावणारे,
असे काही तो बोलतो...
किडमिड्या अक्षरातून
भाव मात्र चोख, हृदयाला पोचतात..
जणू दिसते त्याला पुढचे सारे
तो जपायला सांगतो एकमेकांना
नी जपायला शिकवतो पाणी, सृष्टी, प्राणीमात्र...
भूतदया, श्रद्धा, प्रेम, शांती, करूणा आणि अहिंसा ...
तो शिकवतो सूत कातायला नी लज्जा राखायला
तो सांगतो जमीन राखायला नी प्रेम फुलवायला
तो शिकवतो हातात हात घालून नांदायला
त्याचे हातच मोठे, आजाणूबाहूच तो
रामकृष्णबुद्धा सारखा ख्रिस्तालाही जवळचा
सर्वांचाच आपला असा ...
त्यामुळेच जगाने त्याचा
मानवतेचा एकमेव धर्म सर्वोपरी हे मानले..
सर्व धर्मांचे मूळ नी सार एक,
अखिल मानवजातीचे सुख...
किती सरळ, साधे आहे त्याचे तत्वज्ञान..
सरळ साधे वागणे, बोलणे नी जीवन..
म्हणून आज त्याचे महत्व मुद्दाम समजून घ्यावे...
भाषा, साहित्य, वर्तन, जीवनदर्शन यात क्लिष्टपणा आणणे अत्यंत सोपे असून ते स्वार्थच अधोरेखित करते...
परंतू त्यात सोपेपणा आणणे अत्यंत कठिण कार्य ..
त्यासाठी जीवन वेचणे हे अत्यंत धीराचे,
अखिलमानवजाती उत्थानाकरिताचे
प्रेम व सच्या समर्पणाचे व उच्च कोटीच्या संतपणाचे
प्रमुख लक्षण आहे
पण त्याला संत महात्मा म्हटलेले आवडत नाही
मात्र आपल्याला प्रेमापोटी हक्काने त्याने शिकवलेले धडे
तर आपण नक्की वाचू, समजू शकतो ना..
किमान जाणून तर घ्यायला हवे..
हे आयुष्याचे धडे,
तुम्हाआम्हाला समजतील अशा
सोप्या भाषेतील धडे,
शोध घ्या नी वाचा...
विपुल लिहिले आहे..
वाचा की त्याच्याच शब्दात...
सहज समजत जातो बापू...
***
© अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा