आताच करायला हवं !

आताच करायला हवं !


हीच वेळ आहे 

आताच करायला हवं 

बदलायला हवं

पाऊल पुढं टाकायला हवं

मन मोठं करायला हवं 

नीतीला जगायला जागवायला हवं

हातात हात घ्यायला हवा

हातात हात द्यायला हवा

होतं असं आयुष्यात कळेनासं...

.....कधी कधी

आपला हेका सोडून जरा 

शाण्यासुरत्याकडं बघायला हवं

कधी त्याच्या मागं चालायला हवं 

वाट सुदरली की मग परतायला हवं 

कोणाचं आधार घेणं वाईट नाही 

त्यात चुकीचं असं काहीच नाही 

पुढं कवा तरी त्यालाबी लागंलंच

तवासाठी तयार व्हायला हवं

आजची येळ वैऱ्यावर येऊ नये  

जरी आपल्याच लोकांनी आणली असली तरी 

तिचं ताईत करून हिंडायला नगं

चुकीला चूक म्हणायला हवं

कोण बरोबर हाय ते वळखायला हवं 

उगाच झालेली की ठासून भरलेली 

जळमटं मिरवण्यात कुठलं भलं

कोणीतरी स्वार्थासाठी आपलं डोकं 

बिघडवलंय हे कळायला हवं 

अन आता तर सुद्रायला  हवं

आपलं आपण जगायला हवं 

जबाबदारीनं वागायला हवं 

वाट कशी बसून सरंल 

आपून हून चालायला हवं

चालणाऱ्याचं पाय बनायला हवं

आपली वाट कुणी मळली 

आपली वाट कोण चालला 

हे शोधायला हवं 

समजायला हवं

त्याची साथ धरायला हवी 

त्याची साथ करायला हवी 

त्याचा हात धरायला हवा

आणि कुणाला लागंल त्याला 

आपला हात द्यायला हवा

इतकं सोपं गणित असताना 

डोकी आपली कुजवतंय कोण 

हे आता तरी ओळखायला हवं 

त्याचं डोकं ठिकाणावर आणायला हवं

त्यासाठी

पयलं आपलं डोकं नीट आपल्या ताब्यात आणायला हवं आपल्याच मनानं आपलं डोकं हलायला हवं

कुठलंबी गोड औषध, गोड शब्द, कानातून, नजरेतून, कामातून, मस्तकात जात असताना..

काळजीपूर्वक पारखून घ्यायला हवं

यासाठी खरं खुरं शिक्षण खरं खरं शिकायला हवं

आता पर्यंत झालं ते बास झालं 

असं स्वतःच स्वतःला निक्षून सांगायला हवं

कुबड्या, दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या 

हळू हळू टाकून देऊन 

आपल्याच पायावर आपण उभं राहायला हवं

आधाराला हात देणाऱ्यालाही पारखून घ्यायला हवं 

कुबडी देणाऱ्याला मात्र आता नाकारायला हवं

आपली साथ द्यायला कोण आलेत हे पाहायला हवं

आपली साथ कोण मागतंय त्याला हात देत सोबत पुढे जायला हवं

निस्वार्थी मनाने आपल्यासाठी कोण, काय करतंय हे मनाने ओळखून मनामनात 

त्याचं बी पेरायला हवं... 

त्याचं बी पेरायला हवं... 

             *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी