प्रेरक कायदे

प्रेरक कायदे

जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात....

पालवी फुटली की चिवचिवाट सुरू होतो

पानगळ झाली की चिवचिवाट थांबतो

जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात....

एरव्ही सोबत न बसणाऱ्या पक्ष्यापाखरांची वस्ती

वादळा पावसात,

एकाच झाडावर, एकाच फांदीवरही दिसून येते

जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात.... 

ऊन्हाच्या झळा वादळवारा वणवा झेलणारे झाड 

पुन्हा फळाफुलांनी बहरून प्राण्यापक्ष्यांच्या स्वागताला सज्ज उभे राहते..

जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात....

खारीने खाण्यासाठी फळे नेली तिने ती सर्वच न खाता कुठे कुठे लपवली आणि ती विसरलीही हे पाहूनही झाड काही खारीला मज्जाव करत नाही.. 

जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात....

फुला फळांनी डवरलेले झाड कीटक, प्राणी, पक्ष्यांच्या आगमनाची प्रतिक्षाच करत असते 

त्यांनी फळे खावी, बी दूर दूर न्यावी

आपली प्रजाती वाढवावी 

पण अंग सोंड दात झाडावर घासणाऱ्या हत्तीने 

कोवळी पालवी खाता खाता क्वचित मुळासकट झाडही उपटले तरी झाड त्याला अपाय मात्र करत नाही.. 

जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात....

वणव्यात सापडलेल्या वनाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता पक्षिणी आपल्या चोचीने जळती काडी काडी ओढते, दूर नेते, पंखांनी विझवते... 

पंख जाळून घेते ..

वनाला कवेत घेणारा वणवा तिला कवेत घेऊ पाहत  असतानाही ती घर वाचवते, ती झाड वाचवत असते...  

जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात....

पुरात जंगलच वाहून जात असताना 

वाहत्या ओंडक्यावरून हाडवैरी पशू पक्षी प्राणी सर्व 

तहान भूक विसरून फक्त वननियमांचे पालन करत निर्धोक प्रवास पूर्ण करतात.   

असे जंगलाचेही, आपले असे काही कायदे असतात....

     *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी