अप्रुप

अप्रुप


मज कळाया लागलेल्या 

त्या वयातील गूजगोष्टी 

थेट तुझ्या शब्दात आल्या

याचे अप्रुप वाटत आहे  


मी मला अन् तुझे तुला गे

कळण्याच्याही किती अगोदर 

एकमेकांना समजलो

याचे अप्रुप वाटत आहे 


हरवलेल्या बालपणातील

कर्तव्यांच्या सुखद सुळावर

भरकटताना गोळा केलेस

याचे अप्रुप वाटत आहे


कुमारवयातील आंदोलनांचे 

ठोके अवचित पडतानाही

स्वत्व जपून मज सावरलेले

याचे अप्रुप वाटत आहे


कठोर वेदना काळाच्याही 

सहज साहता याव्या म्हणुनी

काया त्यागुन मन घडविले 

याचे अप्रुप वाटत आहे


अंतरंग जाणून उभयता 

द्वैत रक्षुनी एक जाहलो 

सदा पाळली लक्ष्मणरेखा  

याचे अप्रुप वाटत आहे


अबलेनेही कणाकणाने

महाबली बलवान रचावा

इतकी शक्ती प्रेमामध्ये

याचे अप्रुप वाटत आहे


  *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी