*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर.*
👉चमत्कारामागील विज्ञान सप्रयोग व्याख्यान कार्यक्रम संपन्न.
स्थळ :- येऊर हिल्स, ठाणे.
समता विचार प्रसारक मंडळ ठाणे यांनी सालाबादप्रमाणे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील मुलांचे चार दिवसांचे निवासी शिबिर घेतले.
मंडळाने तळागाळातून येणाऱ्या, चिकाटीने शिक्षण घेणाऱ्या आणि माध्यमिक शालांत परीक्षेची पायरी ओलांडणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे गुणगौरव करण्याचे कार्य अविरतपणे तीन दशकांहून अधिक काळ नेटाने सुरू ठेवले आहे.
ठाण्यातील महापालिका शाळांतून शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना विविध कलागुण जोपासता यावेत आणि विविध व्यवसायांची निवड आपल्या वकुबाप्रमाणे करता यावी याकरिता हे निवासी शिबिर आयोजित केले जाते. यात भाषण कौशल्य, नेतृत्व गुण विकास, हस्तकला , अभिनय केला आणि असेच ईतर अनेक कलांचे प्राथमिक मार्गदर्शन होईल अशी कार्यक्रमाची आखणी असते . दरवर्षी  काहीतरी नावीन्यपूर्ण अशा कार्यक्रमांची रेलचेल असल्याने विद्यार्थीही मोठ्या संख्येने शिबिरास हजेरी लावतात. राहणे खाणे निवास व्यायाम आणि मार्गदर्शन कार्यशाळा असे सर्व काही मुलांना पुरवताना संस्थेच्या संस्थापिका लतिका ताई अविरत झटत राहतात.
👉अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या माई, वंदना शिंदे यांचे समविचारी संस्थांशी जुळवून अंनिसच्या कार्यक्रमांची आखणी करण्याचे कौशल्य मोठे असल्याने समता विचारप्रसारक मंडळाच्या शिबिरात अंनिसचा चमत्कारातून विज्ञान कार्यक्रम आणि चळवळीची गाणी हे ठरलेले  समीकरण आहे. हा  सहभाग तीन दशकांहून अधिक काळ अविरत सुरू आहे.  तसेच बहुतेकदा शिबिरास माईंचे वस्तीला राहून मुलामुलींशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेणे त्यावर शक्य असल्यास उपाय देणे सुचविणे पुढील मार्गदर्शन करणे आणि अंनिसच्या अनेकविध कार्यप्रणालीची ओळख जाता जाता आपल्या दिनचर्येतून नकळत करून देणे असे माईंचे कार्य सतत प्रवाही आहे..
यंदाच्या शिबिरात उद्घाटनप्रसंगी आपला कार्यक्रम माईंनी सादर केला . 55 हून अधिक मुलामुलींशी माईंनी सप्रयोग व्याख्यानातून संवाद साधला . मंडळाच्या वरिष्ठ गटातील अनुभवी मुलांनी उपलब्ध साधन साहित्यातून शिबिरस्थळाची  साजेशी सजावट, तयारी इत्यादी उत्तम केली होती. त्यांनी गाणी आणि चमत्काराचे विविध प्रयोग सादर करण्यात माईंसोबत मुलांमध्ये उत्साह भरला. शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि पालक अशा विविध भूमिका बजावणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी यांनी माईंचे भरभरून कौतुक आणि आभार व्यक्त केले ..
....माईंच्या अशा सर्वसंचारी प्रेरक कार्याचे रहस्य म्हणजे
सामाजिक कार्याने झपाटलेले आयुष्य. सामाजिक कार्याची ओढ, आणि सक्रिय कृतिशील  कार्यक्रम याबद्दल शंकाच नाही..
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी